Congress to decide on Sunday the two names of the nominated members : आमदार विकास ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या बैठक; दोन जागांसाठी डझनभर इच्छुक मैदानात
Nagpur नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसतर्फे स्वीकृत सदस्य म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत अनेक नावांची चाचपणी करण्यात आली असून, काही पराभूत उमेदवारांनीही यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, प्रदेश काँग्रेसने पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी न देण्याचा स्पष्ट आदेश काढल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या रविवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे बैठक घेऊन दोन नावे निश्चित करणार असल्याचे समोर आले आहे.
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ३४ नगरसेवक निवडून आले असून, उद्धव ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीत गटनोंदणी केली आहे. यामुळे काँग्रेस आघाडीची एकूण सदस्य संख्या ३६ झाली आहे. १५१ सदस्यीय नागपूर महापालिकेत एकूण १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
Gram Panchayat : शेवटी ग्रामपंचायतींचा कारभार अधिकाऱ्यांच्याच हाती, सरपंचांची मागणी धुडकावली
१५ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य या सूत्रानुसार काँग्रेस आघाडीच्या वाट्याला दोन जागा येणार हे निश्चित आहे. इतर पक्षांमध्ये भाजपचे १०२ नगरसेवक असल्याने त्यांचे ७ सदस्य, तर एमआयएम आणि मुस्लिम लीग आघाडीचे १० नगरसेवक असल्याने त्यांचा १ सदस्य नियुक्त होईल.
निवडणुकीदरम्यान काँग्रेसला बंडखोरी रोखण्यात मोठे यश आले होते. आमदार विकास ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर अनेक इच्छुकांनी माघार घेतली होती, त्यामुळे आता डझनभर इच्छुकांमधून केवळ दोघांची निवड करताना पक्षाची मोठी कसरत होणार आहे.
या निवडीत काही दिग्गज पराभूत नेत्यांची नावे चर्चेत होती, ज्यामध्ये विकास ठाकरे यांचे निकटवर्तीय प्रशांत धवड यांचाही समावेश होता. धवड यांनी पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी स्वतःचा प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवली होती आणि अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र, प्रदेश काँग्रेसच्या नव्या नियमामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग सध्या बंद झाला आहे.
Rohit pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा दिल्लीत स्फोटक आरोप
यावेळी पक्षाने वर्षानुवर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत’, असा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेस या माध्यमातून करणार आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीत कोणत्या दोन नावांवर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








