If citizens’ complaints are ignored, action will be taken : नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले तर कारवाई
Nagpur अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत नकारात्मक भाव वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पावले उचलली आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना त्यांनी सज्जड दम भरला आहे.
महापालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात येणाऱ्या तक्रारी संदर्भात हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या वेगाने दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मनपा तक्रार निवारण प्रणालीची आढावा बैठक आयुक्तांनी घेतली.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक अभियंता, अग्निशमन विभाग प्रमुख, मुख्य वैद्यकीय अधिकारी, सर्व सहायक आयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता व माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्निल लोखंडे आदी उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता महानगरपालिकेने ऑनलाइन पोर्टल सुविधा सुरू केली आहे.
नागरिकांकडून ऑनलाइन स्वरूपात तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच झोन स्तरावर व विविध विभागातून आलेल्या तक्रार निवारण प्रणालीची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी बैठकीत दिली. महानगरपालिकेच्या ‘ग्रिव्हन्स रिड्रेसल पोर्टल’वर प्राप्त तक्रारी सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा स्वीकारला जाणार नाही, असेही त्यांनी बजावले. बैठकीमध्ये गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचेदेखील त्यांनी निर्देश दिले.
Chief Secretary of Maharashtra : आदिवासींच्या आरोग्याला प्रगत उपचाराची गरज
मनपातर्फे १ डिसेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत २६०५ तक्रारीचे निवारण करण्यात आले असून २,३१२ तक्रारींवर नागरिकांचे मत प्राप्त झाले आहे, अशी माहिती आंचल गोयल यांनी दिली. ज्या भागातून तक्रार आली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. झोन स्तरावर आलेल्या तक्रारीचा आढावा सतत घ्यावा. तक्रारीची योग्य दखल घेत नागरिकांना ऑनलाइन उत्तरे देण्यात यावीत, असे निर्देशही डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.