NMC claims that there are only 497 potholes in Nagpur : कुठे रस्त्यांची कामे सुरू, तर कुठे डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांच्या माळा
Nagpur नागपूर महानगरपालिकेने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील खड्डे मोजले. चाळीस लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात या यंत्रणेला फक्त ४९७ खड्डे दिसले. महापालिका म्हणते की नागपुरात एवढेच खड्डे आहेत. पण लोकांनी मात्र त्याहून पाचपट असल्याचा दावा केला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यासाठी खोदून ठेवले, पण कामच सुरू झालेले नाही. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षापासून खड्ड्यांच्या माळा तश्याच आहेत. हे वास्तव महापालिकेला दिसले नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा चेहरामोहरा बदलला हे खरे आहे. पण महापालिकेला सुधारण्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही. नागपुरातील रस्त्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. अनेक डांबरी रस्ते बऱ्याच कालावधीपासून दुरुस्त केलेले नाहीत. मनपाच्या हॉटमिक्स विभागाकडून शहरात केवळ ४९७ खड्डेच असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मान्सूनपूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे गरजेचे आहे. महापालिकेने नदी नाल्यांची सफाई जानेवारीपासून सुरू केली आहे. मात्र, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. झोन कार्यालयाकडे तक्रारी येऊनही त्यांनीही खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले नाही आणि हॉटमिक्स विभागाला सूचना दिल्या आहे. तक्रारी वाढत असल्याने हॉटमिक्स विभागानेच शहरातील रस्त्याचा सर्व्हे करून ४९७ खड्डे शोधले आहे.
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने ८ मे रोजी हॉटमिक्स विभागाने बैठक बोलाविली होती. शहरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या स्थळी पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी बांधकाम करणाऱ्या संस्थेची आहे.
Nagpur Municipal Corporation : अडिच कोटींचा महसूल फक्त नोंदणीतून!
हॉटमिक्स विभागाचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले की, विभागाने आपल्या स्तरावर सर्व्हे केला आहे. यात दहा झोनमध्ये ४९७ खड्डे आढळून आले आहेत. ५ दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होईल. हॉटमिक्स विभागाने स्वत:च्या स्तरावर खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्वी रस्त्यावरील खड्डे व नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्यासाठी झोन कार्यालयाकडूनही रस्त्यावरील खड्डे व खराब रस्त्याची माहिती मागितली आहे.