
BJP’s Neeta Thakre is Nagpur’s new Mayor : काँग्रेसचा ६८ मतांनी केला पराभव, लीला हातीबेड उपमहापौर
Nagpur नागपूर शहराच्या नव्या महापौर म्हणून भाजपच्या नीता ठाकरे यांनी आज दणदणीत विजय मिळवला. महापालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत नीता ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा ६८ मतांच्या फरकाने पराभव केला. नीता ठाकरे यांना एकूण १०४ मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ३६ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत भाजपला मित्रपक्षांची देखील साथ लाभली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने भाजपच्या उमेदवाराला मतदान करून महायुतीची ताकद स्पष्ट केली.
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध जाण्याची शक्यता
निवडणुकीच्या निकालात एमआयएम (६ मते), मुस्लिम लीग (४ मते) आणि बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक तटस्थ राहिला. या तटस्थ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, विरोधकांनी एमआयएम आणि मुस्लिम लीगवर भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप केला आहे.
उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. भाजपच्या लीला हातीबेड यांनी काँग्रेसचे उमेदवार विवेक निकोसे यांचा पराभव करत उपमहापौरपद पटकावले. या विजयामुळे नागपूर महानगरपालिकेवर भाजपची पकड पुन्हा एकदा घट्ट झाली आहे.
सभागृहातील वातावरण विजयाच्या घोषणेनंतर चांगलेच तापले होते. भाजप नगरसेवकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत विजयाचा जल्लोष साजरा केला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नगरसेवकांनी ‘जय संविधान’चा नारा दिला.
विशेष म्हणजे, काँग्रेस नगरसेवक आपल्यासोबत संविधानाची प्रत घेऊन सभागृहात आले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच काँग्रेसने पुढील कामकाजावर बहिष्कार टाकला. संख्येने कमी असूनही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण आक्रमक विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.








