Nagpur Police : महिलेने संगीत शिक्षकाला घातला गंडा!

 

A woman robbed several people, including a music teacher : राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे सांगून फसवणूक

Nagpur साधारणतः संगीत शिकायला येणाऱ्या शिष्याला गुरूने गंडा बांधायचा असतो. गंडाबंधन झाले की शिष्याने गुरूसोबत एकनिष्ठ राहायचे असते. नागपुरात मात्र एका महिलेने संगीत शिक्षकालाच गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला संगीत शिकायला गुरूकडे जात होती. पण तिने गुरूचीच फसवणूक केल्यामुळे चांगलीच चर्चा होत आहे.

राजकीय आणि शासकीय अधिकार्‍यांशी चांगली ओळख असल्याची बतावणी करणे. नोकरी लावून देण्याच्या गोष्टी करणे. या प्रकारासह एका महिलेने अनेकांची फसवणूक केली. सध्या तीन पीडित पुढे आले असून पीडितांची संख्या वीसच्यावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या तिघांची २३ लाख रुपयांनी फसवणूक झाली आहे. पोलिसांनी त्यांचे बयान नोंदविले आहे. कल्याणी जयपूरकर रा. बेलतरोडी असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती स्वतला एका राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे सांगते, हे विशेष.

Sanjay Raimulkar Siddharth Kharat : राजकीय वादातून अधिकाऱ्यांना नोटीस!

कल्याणीसोबत वामन डंबारे (५९), त्याची पत्नी कलावती डंबारे (५५) आणि त्याचा मुलगा कपील (३०) रा. चंद्रपूर यांचा आरोपीत समावेश आहे. अयोध्यानगर येथील रहिवासी फिर्यादी नितेश सावरे (४०) हे संगीत शिक्षक आहेत. एका कार्यक्रमात आरोपी आणि नितेश यांची ओळख झाली. कल्याणी ही नितेशकडे संगित शिकायला जायची. दररोजच्या बोलण्यात ती स्वतला एका राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी असून शासकीय अधिकार्‍यांची ओळख असल्याचे सांगायची.

मोठमोठ्या गोष्टीमुळे संगीत शिक्षक प्रभावित झाल्याचे पाहून कल्याणीने एके दिवशी महाजेनकोमध्ये जागा निघाल्या असून नोकरीवर लावून देण्याचे आमिष दिले. शिष्य असल्याने आणि आतापर्यंतच्या मोठमोठ्या गोष्टींमुळे नितेशलाही तिच्यावर विश्वास बसला. कल्याणीने त्यांना कागदपत्रासंदर्भात विचारपूस केली. तसेच संपूर्ण कागदपत्रे डंबारे कुटुंबाच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठविण्यास सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे नितेश यांनी कागदपत्रे पाठविले. तसेच टप्प्याटप्प्याने रोख रक्कमही दिली.

Central Government : अकोल्यातील पार्सल थेट पोहोचले अमेरिकेत!

काही रक्कम ऑन लाईन बँक खात्यात पाठविली. असे एकूण पाच लाख रुपये डंबारे यांना दिले. यासोबतच फिर्यादीचे मित्र प्रलय चौधरी ६ लाख रुपये तसेच गंगा गोल्हर यांच्या मुलास नोकरी लावून देण्यासाठी १२ लाख रुपये घेवून त्यांची सुध्दा फसवणूक केली. बराच कालावधी लोटल्यानंतर नोकरी मिळत नसल्याचे पाहून फिर्यादीने त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला.

आरोपी विविध कारणे सांगून वेळ मारून नेत होते. नंतर आरोपीने अर्ध्या रकमेचा धनादेश दिला. मात्र, तो धनादेशही बँकेत नाही. अखेर त्रस्त झालेल्या फिर्यादीने बेलतरोडी ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. उपरोक्त चारही आरोपी विरुध्द कलम ४२०, ४०६, ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला. फिर्यादीचे बयान नोंदवून कल्याणी यांची चौकशी करण्यात आली.