Breaking

Nagpur Police : गर्लफ्रेंडला आयफोन देण्यासाठी केल्या चोऱ्या !

iPhone Stolen for Girlfriend’s Birthday gift : सख्ख्या भावाच्या सोबतीने घरफोड्या

Nagpur गोविंदाच्या एका चित्रपटातील एक संवाद आहे; ‘मै तेरे प्यार में क्या क्या ना बना मीना; कभी बना कुत्ता कभी कमीना’. या डायलॉगची प्रचिती देणारी एक घटना नागपुरात घडली आहे. एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी चक्क आयफोनची चोरी केली. आपला प्रियकर सर्राईत चोर असल्याचे कळल्यावर मात्र तरुणीला धक्काच बसला. त्यामुळे गर्लफ्रेंडचा आनंदही अगदी तात्पूरता ठरला.

एकाच वस्तीत राहणाऱ्या दोन महाविद्यालयीन मुला-मुलीचे एकमेकांशी सूत जुळले. दोघेही प्रेमात आकांत बुडाले. अशातच प्रेयसीने प्रियकराला महागडा आयफोन गिफ्ट म्हणून मागितला. प्रेयसीला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी महागडा आयफोन विकत घेण्यासाठी प्रियकारने आटापीटा सुरु केला. मात्र, पैसे जुळत नव्हते. त्यामुळे त्याने सख्ख्या भावाच्या सोबतीने घरफोड्या करण्यास सुरुवात केली.

चोरीतील काही रक्कम तिच्या सौदर्यप्रसाधने आणि महागड्या कपड्यावर उडविली. परंतु, प्रेयसीवर पैसे उडवत असतानाच पोलिसांनी चोरीचा छडा लावला. कळमना पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याचा भाऊ दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वीच ७ ते ८ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचे आई-वडील कळमना मार्केट येथे हमालीचे काम करतात. प्रेयसी मुलगी आणि आरोपी एकाच वस्तीत राहत असल्याने दोन भावांपैकी एकाचे तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. ती नवव्या वर्गात शिकत असून मागील तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु आहे.

मुलीचे आई-वडिल देखील कळमना मार्कट येथे हमालीची कामे करतात. दरम्यान, प्रेयसीला प्रियकराकडून आयफोन गिफ्ट हवा होता. त्यामुळे तिने प्रियकराकडे आयफोनसाठी तगादा लावला. प्रियकरानेही प्रेयसीला आयफोन भेट देण्याचा चंग बांधला. त्याने एका भावाला सोबत घेतले आणि कामनानगर येथे एका घरातून १ लाख ४४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. मोठी रक्कम हाती लागल्यानंतर त्याने प्रेयसीच्या सौदर्यप्रसाधने आणि महागड्या कपड्यावर यातील काही रक्कम खर्चही केली.

अशाप्रकारे काही ठिकाणी चोरी केलेली रक्कम प्रेयसीवर खर्च होत होती. त्यामुळे आयफोन घेण्यासाठी पुन्हा अडचण येत होती. त्यामुळे प्रियकराने एकापाठोपाठ अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या. चोरीच्या पैशातून प्रेयसी मौजमजा करीत होती. तसेच आयफोन गिफ्ट न केल्यामुळे रुसत-फुगत होती. त्यामुळे प्रियकर वारंवार घरफोड्या-चोऱ्या करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पोलिसांनी घरफोडीचा छडा लावत दोन्ही विधीसंघर्षग्रस्त भावांना ताब्यात घेतले.

दोघांनीही कामनानगर कामठी रोड येथे राहणाऱ्या दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (३६) यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडला. आलमारीत ठेवलेली १ लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना दोघेही संशयितरित्या आढळले. पोलिसांना बघून ते पळाले असता सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. खिश्यातून मोठी रक्कम आढळली. अधिक चौकशीत त्यांनी प्रेयसीला आयफोन गिफ्ट करण्यासाठी घरफोडी केल्याची कबुली दिली.