Prostitution in half of the massage centers in Nagpur : गंगा स्पामधील छाप्यातून चार तरुणींची सुटका
Nagpur शहरात सुरु असलेल्या निम्म्याहून अधिक ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये ‘सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेने घातलेल्या २६ छाप्यात तब्बल १४ ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये देहव्यापार करताना तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. तर नागपुरातील सर्वाधिक नामांकित असलेल्या गंगा स्पामध्ये पोलिसांनी छापा घालून ४ तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक ब्युटी पार्लर, पंचकर्म, युनिसेक्स सलून आणि ‘स्पा-मसाज सेंटरच्या आड बिनधास्त देहव्यापार सुरु असतो. देहव्यापाराचे लोण हे महिला जीमपर्यंत पोहचले आहे. ‘स्पा-मसाज सेंटर’मध्ये सर्वाधिक देहव्यापार होत असल्याचे पोलिसांच्या छापा कारवाईवरुन समोर आले आहे. सोमलवाडा चौकातील गंगा स्पा सेंटरमध्ये देहव्यवसायाचा कारभार सुरू होता.
सेंटरचे मालक दाम्पत्य हा अवैध व्यवसाय चालवत होते. व्यवसायाची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येथे छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली. तर अवैध व्यवसाय चालविणारा स्पा सेंटरचा मालक नवीन भगवान सिंग (३७, रा. अमरनगर, सोनेगाव) याला अटक केली आहे. तर त्याची पत्नी विद्या उर्फ श्रृती नवीन सिंग ही देखील या प्रकरणात आरोपी आहे.
CDCC Bank Chandrapur : नोकर भरतीतील आरक्षणासाठी मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना कॉल !
गंगा स्पा सेंटरमध्ये देहव्यवसाय सुरू होता. नवीन सिंग आणि त्याची पत्नी श्रृती सिंग या दोघांनीही काही तरुणींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवले. देहव्यवसायाच्या दलदलीत ढकलले. दोघेही या मुलींकडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यवसाय करून घेत होते. तर देहव्यवसायाकरिता तरुणींना ग्राहक आणि जागा उपलब्ध करून देत होते. सिंग दाम्पत्याच्या या व्यवसायाची कुणकुण गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदारांना लागली होती.
पोलिसांनी रचला सापळा
पोलिसांनी शनिवारी एक बनावट ग्राहक ‘स्पा-मसाज सेंटर’ला पाठविला. येथे या ग्राहकाने त्यांच्याकडे तरुणीबाबतची मागणी केली. आरोपींनी त्याला एका तरुणीसोबत पाठवले. या ग्राहकाने लगेच पोलिसांना इशारा केला. गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली आणि मालक नवीन सिंग याला ताब्यात घेतले. कारवाईत पोलिसांनी ४ पीडित तरुणींची सुटका केली.