Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा करिष्मा..! नागपूरला मिळणार ४०० नवीन बसेस

Nagpur will get 400 new buses Booster dose to the city’s public transport system : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बूस्टर डोज

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदी असताना घेतलेल्या पुढाकारामुळे नागपुरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बूस्टर डोज मिळणार आहे. त्यांनी दिलेल्या निधीतून अडीचशे नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहे. आपली बसच्या ताफ्यात या नवीन वर्षात ४०० बसेस दाखल होतील. त्यामुळे नागपुरकरांचा प्रवास सहज व सोपा होणार आहे.

नागपूर महापालिकेतर्फे आपली बसचे संचालन करण्यात येत आहे. सध्या आपली बसच्या ताफ्यात ४८० बसेस असून, त्यातील २३० बसेस इलेक्ट्रिक आहे, तर डिझेल व सीएनजीच्या बसेसही आहे. परंतु, डिझेलच्या बसेसचे आयुष्यमान संपण्याच्या मार्गावर आहे.

दुपटीपेक्षा खर्च जास्त

तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या परिवहन विभागाला १३७ कोटींचा निधी दिला होता. या निधीतून सुमारे २५० नवीन बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन विभागाला बसेसच्या संचलनावर महिन्याला १४ कोटी रुपये खर्च करावे लागत असताना केवळ सहा कोटींचे उत्पन्न मिळत आहे.

ही तूट कमी करण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी १०८ कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद केली जाते. त्यामुळे परिवहन विभाग ई-बस चालवून तोटा कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. पुण्याच्या ईका कंपनीकडून नवीन बस खरेदीची प्रक्रियाही सुरू झाली असून, नवीन बसेस ह्या जून जुलै महिन्यात नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर

तसेच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पीएम ई-बस सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर शहराच्या परिवहन सेवेसाठी मनपाला १५० ई-बसेस मिळणार आहेत. त्यासाठी आता मनपाच्या ‘आपली बस’ सेवेत १५० ई-बसेससह अद्ययावत दोन चार्जिंग डेपो कार्यान्वित होणार आहेत.

नागपूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नवीन बसेसच्या संदर्भात वेगाने कार्यवाही करण्यात आली. उपमुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयावर आत्ता अंमलबजावणी होण्यामागे तेच कारण असल्याचेही बोलले जात आहे.