Let corrupt ministers and officials be caught or let them escape : नाना पटोलेंचा महायुती सरकारला गंभीर इशारा
Mumbai : महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे.
महायुती सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगनमताने ८०.९९ कोटींच्या खरेदीत २३.०७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराची पोलखोल पटोले यांनी केली आहे. कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेतून खिसे भरण्याचा गोरखधंदा जोरात सुरु होता. कृषी विभागाची घोटाळा करण्याची एक मोडस ऑपरेंडी आहे. कापूस साठवणूक पिशवी खरेदी घोटाळ्याप्रमाणे बॅटरी स्प्रेअर खरेदीतही त्याच पद्धतीने भ्रष्टाचार केला असल्याचे ते म्हणाले.
बॅटरी स्प्रेअर खरेदीत घोटाळा कसा झाला, हे सांगताना नाना पटोले म्हणाले की, कापूस सोयाबीन योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर वस्तू पुरवठा करण्याच्या योजनेत कृषी उद्योग विकास महामंडळ व कृषी मंत्रालयाने बॅटरी स्प्रेअर व्यवहारात मोठा घोटाळा केला आहे. कृषी उद्योग विकास महामंडळ आयुक्तालयाकडून बॅटरी स्पेअर उत्पादनासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी निधी अग्रीम स्वरुपात २८/३/२०२४ रोजी ८०.९९ कोटी रुपये महामंडळास अदा करुन घेतले.
उत्पादकाकडून बॅटरी स्पेअर खरेदी करुन पुरवठा करायचा असताना कच्च्या मालाचा प्रश्नच येत नाही. तरीही महामंडळाने दिशाभूल केली. यासाठी ई निविदा न काढताच पुणे येथील महामंडळाच्या वर्कशॉपची जागा भाड्याने देणे आहे, या शिर्षकाखाली निविदा अभियांत्रिकी पोर्टलवर प्रकाशित न करता NOGA (Tomato Ketchup/JAM) च्या पोर्टलवर प्रकाशित केली. कृषी औजार खरेदी निविदा ही कृषी अभियांत्रिकी पोर्टलवर प्रकाशित केली जाते.
महाराष्ट्रातील एमएसएमई नोंदणीकृत उत्पादक पुरवठादार यांना या प्रक्रियेतून वगळण्यात यावे, यासाठी हा उद्योग करण्यात आला. विशेष म्हणजे लोकसभा आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच ५/४/२०२४ रोजी ही निविदा प्रकाशित करण्यात आली असल्याचाही आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
बॅटरी स्प्रेअरच्या खरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व तत्कालीन कृषीमंत्री यांची चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी विभागातील भ्रष्टाचाराकडे गांभिर्याने पहात नाहीत, असे दिसत आहे. पण जनतेचा पैसा व शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्यांना काँग्रेस पक्ष सोडणार नाही. विधिमंडळात या घोटाळ्यासंदर्भात सरकारला जाब विचारू व भ्रष्ट मंत्री तसेच अधिकाऱ्यांना सळो की पळो करुन सोडू, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.