Nana Patole : अवैध हुक्का पार्लरवरून नाना पटोले आक्रमक

Nana Patole aggressive over illegal hookah parlour : फक्त पार्लरच्या मालकांवर कारवाई करून सरकार आपली जबाबदारी संपवणार का?

Bhandara : राज्यभरात अवैध हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. अनेक ठिकाणी हे व्यवसाय पोलिसांच्या छत्रछायेखाली चालत असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत. तरुण पिढीच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्या या धंद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी होत आहे का, हा मोठा प्रश्न असल्याचे आमदार नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी सभागृहात या मुद्द्यावर सरकारला घेरले. फक्त पार्लरच्या मालकांवर कारवाई करून सरकार आपली जबाबदारी संपवणार का? की ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे व्यवसाय बिनधास्त सुरू आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हुक्का पार्लरचा वाढता विळखा..
पोलिसांच्या मर्जीने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांसह लहान शहरांतही अवैध हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कायद्यानुसार हुक्का पार्लर चालवण्यासाठी विशिष्ट परवानगी आवश्यक असते, मात्र अनेक ठिकाणी हे नियम धाब्यावर बसवले जातात. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी तरुण मुले-मुली व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत आहे.

Sanjay Puram : आमदार पुराम सुधारणार आमगाव-देवरीतील बससेवा

पोलिसांवर कारवाई करावी..
दुर्दैवाने, अनेक हुक्का पार्लर पोलिसांच्या नजरेसमोर वर्षानुवर्षे सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी कितीही तक्रारी केल्या तरी काही दिवसांनंतर तेच पार्लर पुन्हा सुरू होतात. याचा अर्थ हा धंदा चालवणाऱ्यांना कुठूनतरी अभय मिळत आहे. सरकारने केवळ पार्लरच्या मालकांवर कारवाई करून स्वतःची जबाबदारी झटकू नये, तर अशा व्यवसायांना अभय देणाऱ्या पोलीस यंत्रणेलाही जाब विचारला पाहिजे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

सरकारचा दिखावूपणा..
राज्यातील अनेक हुक्का पार्लर अचानक बंद करण्यात आले, त्यांच्यावर छापे टाकण्यात आले आणि काही ठिकाणी मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, हा प्रकार काही दिवसांपुरता आहे. सरकार खरोखरच या समस्येच्या मुळाशी जाऊन कारवाई करणार आहे का, याबाबत जनतेत संभ्रम आहे. नाना पटोले यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या, पण त्याची अंमलबजावणी कशी होत आहे? कुठल्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले? कोणत्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे? सरकार हे स्पष्ट करणार का, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.

जनतेने आवाज उठवण्याची गरज..
नाना पटोले यांनी तरुणाईच्या भविष्यासाठी जागरूक नागरिकांनी आणि पालकांनी याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. हा विषय केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहू नये. हा प्रश्न आपल्या मुलांच्या भविष्यासंदर्भात आहे. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनावर दबाव टाकला पाहिजे, असे पटोले म्हणाले.

Sajid Khan : बाबाजानी दुर्राणीची होणार एसआयटी चौकशी

सरकारकडून ठोस पावले अपेक्षित..
हुक्का पार्लरच्या मुद्द्यावर सरकार गंभीर आहे की नाही, हे आगामी कारवाईवरून स्पष्ट होईल. केवळ पार्लर बंद करण्याचे सोंग न करता, त्याला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यासच हा गैरव्यवहार रोखता येईल. अन्यथा “कुंपणच शेत खातं” हीच परिस्थिती कायम राहील, असे स्पष्ट संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत.