shankar-raut-entry-and-exit-from-bjp : ओबीसी सेलच्या अध्यक्षाचा भाजप प्रवेश दोन दिवसांतच रद्द; वाळू माफियाच्या आरोपाने फुके बॅकफूटवर
Bhandara भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यातील ‘वर्चस्व युद्ध’ आता कार्यकर्त्यांच्या पळवापळवीपर्यंत येऊन पोहोचले आहे. मात्र, या चढाओढीत पटोलेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष शंकर राऊत यांचे राजकीय भविष्य ‘ना घर का ना घाट का’ अशा स्थितीत अडकले आहे. भाजपने मोठ्या थाटात केलेला त्यांचा पक्षप्रवेश अवघ्या ४८ तासांत रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून पटोले आणि फुके यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहे. विधानसभेला निसटता विजय मिळवल्यानंतर पटोलेंनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि प्रफुल्ल पटेल या जोडगोळीला अस्मान दाखवले होते. मात्र, त्यानंतर भाजपने जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुकीत पटोलेंना खिंडीत पकडले. याच रणनीतीचा भाग म्हणून शंकर राऊत यांना काँग्रेसमधून फोडून नानांच्या ‘पायाखालची वाळू’ सरकवल्याचा दावा भाजप करत होती.
Sunetra Pawar oath : तातडीचा निर्णय नव्हता; सर्व प्रक्रिया नियमानुसारच
आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत शंकर राऊत यांचा भाजप प्रवेश पार पडला. मात्र, प्रवेश होताच राऊत यांच्या वाळू व्यवसायावरून आणि वाळू माफियाशी असलेल्या कथित संबंधांवरून भाजवर टीकेची झोड उठली. सोशल मीडियावर भाजपच्या ‘स्वच्छ प्रतिमे’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेल्याने पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. कार्यकर्त्यांच्या दबावानंतर आणि बदनामीच्या भीतीने परिणय फुके यांना अवघ्या दोन दिवसांत राऊत यांचा प्रवेश रद्द करावा लागला.
या संपूर्ण नाट्यात शंकर राऊत यांचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे. नाना पटोलेंसारख्या नेत्याची साथ सोडून गेल्याने काँग्रेसमध्ये त्यांना पुन्हा स्थान मिळणे कठीण आहे. वाळू माफियाचा शिक्का बसल्याने भाजपनेही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Finance Commission funds stalled : वित्त आयोगाचा निधी रखडला; जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आर्थिक कोंडीत
नाना पटोले हे अनेकदा अटीतटीच्या प्रसंगातून नशिबाच्या जोरावर बाहेर पडले आहेत, असा इतिहास आहे. विधानसभेत टपाल मतांनी त्यांना तारले होते. आताही त्यांच्या समर्थकाला फोडून त्यांना धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न ‘बूमरँग’ ठरला आहे. आमदार फुके यांच्या अतिउत्साहामुळे भाजपला जिल्ह्यात बचावात्मक पवित्र्यात यावे लागले आहे.








