Police Sub-Inspector arrested for demanding a bribe of Rs. 5,000 : नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील प्रकार, ट्रॅक्टर-ट्रॉलीची सुटका करण्यासाठी मागितले पैसे
Amravati नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाने (PSI) पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. या प्रकरणात PSI दर्शन दिकोंडवार (३८) आणि खासगी इसम सुकेश अनिल सारडा (२९, नांदगाव खंडेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची सुटका करण्यासाठी PSI दर्शन दिकोंडवार यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम खासगी इसम सुकेश सारडा याच्याद्वारे स्वीकारण्याचे ठरले. तक्रार आल्यानंतर अमरावती लाचलुचपत विभागाने १३ मार्च रोजी पोलीस ठाण्यात सापळा रचला.
Vidarbha Farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींचा मदत निधी मंजूर!
कारवाईदरम्यान PSI दिकोंडवार यांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही, मात्र लाच स्वीकारण्याची तयारी दाखविल्याने १८ मार्च रोजी ACBने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मारुती जगताप (पोलीस अधीक्षक, ACB, अमरावती परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर आणि पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड यांच्या देखरेखीखाली सापळा यशस्वीपणे रचण्यात आला.
सापळा रचणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक केतन माजरे, पोलीस हवालदार प्रमोद रायपुरे, पोलीस अंमलदार शैलेश कडू, पोलीस अंमलदार वैभव जायले आणि चालक पो. उपनिरीक्षक सतिश किटुकले यांचा समावेश होता. PSI दर्शन दिकोंडवार आणि सुकेश सारडा यांच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.