Nashik Municipal Corporation : नाशिकमध्ये सत्तेचे ‘अजब’ गणित! महायुतीच्या साथीला मनसे

shivsena-ncp-mns-unexpected-alliance : विरोधक झाले मित्र! महापालिकेत ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत

Nashik नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेला सत्तेचा पेच अखेर सुटला असून, शहराच्या राजकारणात एक अत्यंत अनपेक्षित आणि ऐतिहासिक समीकरण आकारास आले आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने निर्माण झालेल्या अस्थिरतेवर पडदा पडला आहे.

आता भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या चार प्रमुख पक्षांनी ‘गळ्यात गळे’ घालत महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध रान उठवणारे हे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आता सत्तेच्या खुर्चीसाठी एकाच बाकावर बसलेले पाहायला मिळणार आहेत.

या नव्या महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, संख्याबळाच्या जोरावर महापौरपद भाजपकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना (शिंदे गट) या पक्षाला उपमहापौरपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

Davos Summit 2026 : विदर्भाचा कायापालट! दावोसमध्ये ५.९२ लाख कोटींची ऐतिहासिक ‘लॉटरी’

याशिवाय स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या विषय समित्यांची पदे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात समन्वयाने वाटून घेतली जाणार आहेत. नाशिकच्या विकासासाठी आणि शहराला प्रशासकीय स्थैर्य देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी अधिकृत भूमिका या चारही पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे.

Devendra Fadnavis : ‘आता तरी गप्प बसा!’; फडणवीसांनी थेट सुनावले

दुसरीकडे, या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे शिवसेना (ठाकरे गट) आता महापालिकेत प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार आहे. विरोधकांमध्ये सर्वाधिक जागा असल्याने ठाकरे गटाकडे विरोधी पक्षनेतेपद जाण्याचे संकेत मिळत आहेत. प्रचारादरम्यान एकमेकांवर तुटून पडणारे पक्ष आता सत्ताधारी म्हणून कसे एकत्र काम करतात आणि कट्टर विरोधक म्हणून ठाकरे गट त्यांना कसे अंगावर घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या या नव्या राजकीय प्रयोगामुळे स्थानिक पातळीवर सत्ताकारणाचे जुने संदर्भ पूर्णपणे बदलले असून, आगामी पाच वर्षे नाशिक महापालिकेचा कारभार या ‘चतुष्कोणी’ युतीच्या हाती राहणार आहे.