Sanjay Raut announces expulsion, office bearers in trouble : संजय राऊतांनी हकालपट्टी जाहीर केली, पदाधिकारी अडचणीत
Nashik: नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठा स्फोट झाला असून भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) दोन्ही पक्षांत तीव्र अस्वस्थता उघड झाली आहे. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांच्या भाजप प्रवेशावरून स्थानिक पातळीवर जोरदार विरोध सुरू झाला आहे. भाजपच्या निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला थेट विरोध दर्शवला असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली आहे.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने ठाकरे गटात फूट पाडण्याची रणनीती आखली असून, त्याचाच भाग म्हणून गुरुवारी विनायक पांडे, यतीन वाघ आणि शाहू खैरे यांचा भाजप प्रवेश नियोजित होता. या तिघांचे पक्षप्रवेशासाठी भाजप कार्यालयात आगमन झाले असले, तरी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रवेश रखडलेला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी स्पष्टपणे या प्रवेशाला विरोध केल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Municipal election : ५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष, पण ..
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कठोर पाऊल उचलले आहे. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ट्विट करत पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची शिवसेना (ठाकरे गट) मधून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे ठाकरे गटात परतण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे मानले जात आहे.
भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, एका बाजूला स्थानिक भाजप कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणारे नेते आणि त्यांचे समर्थक अशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अद्याप पक्ष कार्यालयात प्रवेश देण्यात आलेला नाही. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार हे या नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
Local body election : महायुतीत अजित पवारांचा पक्ष एकाकी पडत चालला!
गेल्या काही महिन्यांपासून मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीसह पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. बाहेरून नेते आणून पक्ष मजबूत होत नसून, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांनी पन्नास वर्षे पक्षासाठी काम करूनही संधी न मिळाल्याची खंत उघडपणे मांडली.
दुसरीकडे, शाहू खैरे, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमधील नाराजीबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच पक्षप्रवेशासाठी बोलावले असल्याचा दावा करत त्यांनी ही नाराजी भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले.
Muncipal election : मुंबईनंतर काँग्रेसचं पुण्यातही बिनसलं! महाविकास आघाडीत चाललंय काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचा विकास, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि शहराच्या प्रगतीसाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे भाजपमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आणि दुसरीकडे ठाकरे गटाकडून थेट हकालपट्टी, अशा दुहेरी राजकीय कात्रीत यतीन वाघ आणि विनायक पांडे अडकले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीआधीच या घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील तासांत या वादाचा तोडगा निघतो की संघर्ष अधिक चिघळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








