National OBC Federation Launches Strike at Constitution Square in Nagpur : ओबीसी नेते, भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख उपोषणस्थळी दाखल
Nagpur : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ते स्वतंत्र प्रवर्गातून देण्यात यावे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणून चालणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली आहे. त्यासाठी आजपासून (३० ऑगस्ट) शहरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत.
भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते डॉ. आशिष देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि लढा अधिक तीव्र करण्यासाठी आपण तयार असल्याचे ओबीसी कार्यकर्त्यांना सांगितले. ओबीसींचा दुपट्टा आणि पिवळ्या टोप्या घालून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसींच्या आंदोलनाची सुरूवात साखळी उपोषणाने आजपासून करण्यात आली. मुंबईकडे केव्हा कुच करायची, हा निर्णय या आंदोलनाच्या नंतर घेण्यात येईल, असे यावेळी डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
Mudhoji Raje Bhosale : जरांगेंच्या आंदोलनाला शुभेच्छा, पण ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध !
दोन वर्षांपूर्वीही नागपुरात असेच साखळी उपोषण करण्यात आले होते. त्याचवेळी चंद्रपूरमध्ये टोंगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपोषणस्थळी गेले होते आणि मध्यस्थी करून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सरकारकडून ठामपणे सांगण्यात आले होते की, कुठल्याही परिस्थितीत ओबीसींच्या कोट्यातून इतर कुठल्याही समाजाला आरक्षण देण्यात येणार नाही. पण आता मनोज जरांगे तीच मागणी घेऊन मुंबईत गेले असल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.








