Nationalist Congress : रामटेकमध्ये अजित पवारांची ताकद वाढवणार चंद्रपाल चौकसे?

Will Chandrapal Chowkse increase Ajit Pawar’s strength in Ramtek : बंडखोर काँग्रेस नेत्याची राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रामटेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना, त्या मोहिमेत चंद्रपाल चौकसे या महत्वाच्या नेत्याचा समावेश झाला आहे. पर्यटन क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, यशस्वी उद्योजक आणि परिसरात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या चौकसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देवून औपचारिकरित्या पक्षात त्यांचे स्वागत केले. वारंवार राजकीय अपयश आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत.

चौकसे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. ज्यामुळे काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निष्कासित केले होते. याआधी त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत, तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीत महत्वाची पदे भूषवलेली आहेत. राजकारणातील अनुभव, समाजातील मजबूत संपर्क आणि विविध क्षेत्रांतील सक्रियता यामुळेच राष्ट्रवादीने त्यांच्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Local Body Elections : सावनेरातील चार नगरपरिषदा ठरणार देशमुख आणि केदारांच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांची भेट घेतल्यानंतर चौकसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित केला होता. आता अधिकृत नियुक्तीनंतर, रामटेक आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या विदर्भात संघटन वाढवण्याच्या मोहिमेत असून, चौकसे यांच्यासारखे स्थानिक प्रभावी नेते ही मोहिम अधिक गतीमान करतील, असा पक्षाचा विश्वास आहे.

Dr. Mohan Bhagwat : सनातन तत्वज्ञान हे एकात्मिक मानवतेचे तत्वज्ञान !

रामटेकमध्ये आयोजित कार्यक्रमात अरविंद अंबागडे, डॉ. नितीन वेलुरकर, रवि कठोते, नितीन कराडे, मनीष खोब्रागडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चंद्रपाल चौकसे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर रामटेकमध्ये राष्ट्रवादीची संघटनात्मक शक्ती नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसले. चौकसे यांच्या प्रवेशामुळे रामटेक परिसरातील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.