Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Former MP takes an aggressive stand against internal factionalism : अंतर्गत गटबाजीवर थेट बोट; नवनीत राणांची आक्रमक भूमिका, ओवैसींवरही जोरदार टीका

Amravati अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी ४०० पार’च्या घोषणा देत होते, ते चेहरे लक्षात ठेवा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. माझ्या पराभवामागे विरोधकांपेक्षा आपल्या गोटातीलच काही लोक कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं.
माझा पराभव म्हणजे केवळ नवनीत राणांचा पराभव नाही, तर तो संपूर्ण शहराचा पराभव आहे, असा दावा करत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर बोलताना त्यांनी भावनिक, पण तितक्याच आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली.

लोकसभेत नुकसान कुणाचं झालं, तर ते आमच्या मुलांचं झालं, असं म्हणत त्यांनी हा पराभव वैयक्तिक वेदनेशी जोडला. मात्र, ही वेदना गिळून गप्प बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय नवनीत राणा शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

Bmc election : ठाकरे बंधूंच्या एकत्रित मुलाखतीचा टीझर प्रदर्शित!

 

याच भाषणात त्यांनी अमरावती शहराच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपचा महापौर निवडून आला, तर सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले जातील, असं त्यांनी सांगितलं. आपण खासदार असताना अवघ्या पाच वर्षांत अमरावतीसाठी मेडिकल कॉलेज आणि पायलट ट्रेनिंग सेंटर आणल्याची आठवण करून देत त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सत्ता असो वा नसो, शहराच्या विकासासाठी मी लढतच राहणार, असा संदेशही त्यांनी दिला.

भाषणादरम्यान एक प्रसंग विशेष चर्चेचा ठरला. मंचाच्या टोकावर उभ्या असताना भाजपच्या काही उमेदवारांनी ‘भाभी, खाली बघा, पडाल’ असं सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर ‘आता मी पडणार नाही’ असं प्रत्युत्तर देत त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ दिला. आतापर्यंत खूप काही सहन केलं, पण आता परिस्थिती बदलली आहे. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, त्यांच्याशी आता सौम्य वागणार नाही, असा इशाराच त्यांनी या विधानातून दिला.

 

Municipal elections : भाजप – एमआयएम युतीचा राजकीय स्फोट, ‘पार्टी विथ डिफरंस’चा दावा ?

 

नवनीत राणा यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि त्यांच्या पत्नीवरही जोरदार टीका केली. मी कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही, असं ठणकावून सांगत त्यांनी थेट खोडके दाम्पत्यावर निशाणा साधला. कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि उलटे काटे फिरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. तेव्हा तर त्यांचं नशीब होतं की मी विधानसभेत फिरले नाही; नाहीतर दोन हजारांनी निवडून आले असते ना, दहा हजारांनी पडले असते, इतकी ताकद या भगव्यामध्ये आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

आपल्या राजकीय ताकदीचा उल्लेख करताना नवनीत राणा म्हणाल्या की, २०१९ मध्ये याच लोकांनी मला निवडून दिलं होतं. माझी ताकद लोकांमध्ये आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी उभी आहे, कोणाच्या दावणीला बांधून चमचेगिरी करण्यासाठी नाही. ‘आता पुढे कशी खासदार होते ते आम्ही बघतो’ असं म्हणणाऱ्यांना उद्देशून त्यांनी, ‘तुमच्यात दम असेल तर दाखवा,’ असा खुला आव्हान दिलं. या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणातील तापमान पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आहे.

 

Ravi Rana : भाजप आमचा ‘मोठा भाऊ’, अमरावतीत ‘फ्रेंडली फाईट’ची रणनीती

ओवैसींवरही थेट निशाणा
भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात नवनीत राणा यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही थेट निशाणा साधला. काल अमरावतीत ओवैसी येऊन गेले; बाहेर पाकिस्तान आणि हैदराबादमध्येही पाकिस्तानच असल्याची टीका करत त्यांनी वादग्रस्त विधान केलं. तुम्ही किती मुलं जन्माला घालायची हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही; आधी तुम्ही देशात किती घुसखोर घुसवले ते सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेवटी, ज्यांनी माझ्याकडून पैसे घेऊन माझ्यासोबत बेईमानी केली, अशा लोकांना यावेळी धडा शिकवा, असं आवाहन करत त्यांनी आपल्या तीन भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. चौथा उमेदवार कोण असेल, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवत राजकीय उत्सुकता आणखी वाढवली आहे.