Navratri 2025 : उदो बोला उदो… उदो बोला अंबाबाई माऊलीचा…

Navratri festival begins, huge crowd gathers to see the goddess : नवरात्रौत्सवाला सुरुवात, देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Mumbai : महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी राज्यभरातील मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी देवीसह अनेक शक्तिपीठांवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

पुण्यात ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासह शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. मंदिरांची आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि रोषणाईमुळे संपूर्ण शहर नवरात्रमय झाले आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा तिथी वृद्धीमुळे नवरात्र दहा दिवसांचे असून ते २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान साजरे होणार आहे.

GST 2.0 : आजपासून जीएसटी 2.0 लागू, ग्राहकांना मोठा दिलासा

नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात श्री दुर्गामाता दौडही सुरू झाली. गेल्या ४१ वर्षांपासून संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा कायम आहे. यावर्षी दौडीची सुरुवात पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून करण्यात आली.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला तुळजापूर येथे सुरुवात झाली. पहाटे देवीची मंचकी निद्रा संपवून देवीला वाजतगाजत सिंहासनावर विराजमान करण्यात आले. दुपारी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते गाभाऱ्यात घटस्थापना पार पडली. पुढील नऊ दिवस देवीच्या विविध पूजा मांडल्या जाणार असून, भवानी तलवार अलंकार महापूजा भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. मंदिर संस्थेच्या अंदाजानुसार यंदा ५० लाख भाविक दर्शनासाठी दाखल होणार आहेत.

रेणुका माता व सप्तशृंगी देवीच्या गडावर गर्दी
माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, देशभरातून आलेले भाविक दर्शन घेत आहेत. नऊ दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल गडावर रंगणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी गडावरही भाविकांचा प्रचंड उत्साह दिसत आहे. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत येथे यात्रा महोत्सव रंगणार आहे.

मुंबईत मुंबादेवी मंदिरात पहाटे ५:३० वाजता मंगल आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत घटस्थापना झाली. संपूर्ण नवरात्रकाळात २१ विशेष पुजाऱ्यांमार्फत चंडीपाठ होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर आणि १५० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Local body election : अजित पवारांची स्वबळाची तयारी !

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडातून प्रज्वलित झालेली भवानी ज्योत राज्याच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी हजारो तरुण तुळजापुरात दाखल झाले आहेत. हीच ज्योत गावागावच्या नवरात्र महोत्सवात प्रतिष्ठापित केली जाणार आहे.

राज्यातील प्रमुख शक्तिपीठांवर सुरू झालेल्या या नवरात्र महोत्सवामुळे महाराष्ट्र नवरात्रमय झाला आहे. भाविकांच्या जयजयकारात आणि धार्मिक वातावरणात पुढील नऊ दिवसांचा उत्सव रंगणार आहे.