New Nagpur Project : नवीन नागपूरमध्ये आपले स्वागत आहे! जमिनीचे दर निश्चित; थेट खरेदीचा मार्ग मोकळा

Land rates fixed in New Nagpur; path cleared for direct purchase : १,७१० एकर क्षेत्रावर भव्य शहर वसणार, प्रकल्प निर्णायक टप्प्यावर

Nagpur उपराजधानीच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि विदर्भाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या नवीन नागपूर प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. हिंगणा तालुक्यातील मौजा गोधनी (रिठी) आणि लाडगाव (रिठी) येथील सुमारे १,७१० एकर क्षेत्रावर हे भव्य शहर वसणार असून, ३१ मार्च २०२६ पूर्वी जमिनींचे प्रति हेक्टरी दर निश्चित करून एनएमआरडीएकडून थेट खरेदीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली जाणार आहे.

मुंबईतील ‘वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स’ च्या धर्तीवर नागपूरला ‘आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र’ म्हणून विकसित करण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मिहान व समृद्धी महामार्गालगत सुमारे ६९२.०६ हेक्टरवर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हा विकास केला जाणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर महसूल विभागाने जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण केली असून, यामध्ये ६३३ हेक्टर कृषक, ३० हेक्टर अकृषक आणि १२.१९ हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे.
शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलली आहेत.

Banner controversy : बॅनर वादाने राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ; रोहित पवारांचा तीव्र निशाणा !

या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यासोबतच, ते भूमिहीन होऊ नयेत म्हणून प्रति एकर १,५०० चौरस फूट विकसित प्लॉट देण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी स्वखुशीने संमतीपत्रे सादर केली आहेत. जमिनीसोबतच विहिरी, झाडे आणि बोअरवेलचे मूल्यांकनही अंतिम टप्प्यात असून, आज सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

Mehkar Politics : आजी-माजी आमदारांमध्ये वाद चिघळला; हाणामारीपर्यंत पोहोचले मेहकरचे राजकारण

सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘हुडको’कडून ६,५०० कोटींचे कर्ज उभारण्यास शासनाने हमी दिली आहे. नवीन नागपूरमध्ये स्टार्टअप्स, एमएसएमई , बड्या आयटी कंपन्या आणि जागतिक दर्जाची व्यावसायिक कार्यालये यांच्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. समृद्धी महामार्ग आणि मिहानच्या कनेक्टिव्हिटीमुळे हे क्षेत्र भविष्यात गुंतवणुकीचे ‘हॉटस्पॉट’ ठरणार आहे.