nitesh rane praises siddharth kharat in maharashtra assembly : विधानसभेत अनपेक्षित प्रसंग; कौतुकाचा सूर आणि ‘मिस’ झालेले क्षण चर्चेत
Buldhana राजकारणात केवळ भूमिका नव्हे, तर ‘टायमिंग’ही तेवढेच महत्त्वाचे असते, याची झलक विधानसभेत नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगातून पाहायला मिळाली. नेहमी आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नीतेश राणे यांनी यावेळी वेगळाच पवित्रा घेत विरोधी बाकांवरील आमदाराचे खुलेआम कौतुक करून सर्वांचे लक्ष वेधले.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या कामकाजावर चर्चा सुरू असताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी मांडलेल्या सूचनांचा उल्लेख करत राणेंनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीची दखल घेतली. “या खात्याबाबत खरात यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी मांडलेल्या सूचना सकारात्मक असून, त्या निश्चितच विचारात घेतल्या जातील,” असे सांगत राणेंनी विरोधकांचे कौतुक केले. सत्ताधारी पक्षातील मंत्र्याकडून विरोधी आमदाराचे असे कौतुक होणे, हा राजकारणात दुर्मिळ मानला जाणारा प्रसंग असल्याने त्याची लगेचच चर्चा रंगली.
मात्र, या कौतुकाला अनपेक्षित वळण मिळाले. ज्या वेळी राणे सभागृहात खरात यांचे कौतुक करत होते, त्याच वेळी संबंधित आमदार सभागृहात अनुपस्थित होते. त्यामुळे कौतुक झाले, पण ते ऐकण्यासाठी संबंधित आमदार उपस्थितच नव्हते, अशी गंमतीशीर स्थिती निर्माण झाली.
या प्रसंगानंतर राजकीय वर्तुळात ‘टायमिंग’चीच चर्चा रंगू लागली आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहणे हे राजकारणातील महत्त्वाचे अंग मानले जाते. मात्र, या घटनेत कौतुकाचा क्षण आणि संबंधित व्यक्तीची अनुपस्थिती यामुळे ‘राजकीय टायमिंग’चा वेगळाच अर्थ अधोरेखित झाला.
Ashwini Vaishnav, Prataprao Jadhao : खामगाव-जालना गाडीला ११६ वर्षांपासून शेगाव थांब्याची प्रतीक्षा!
दरम्यान, राणेंच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवादाचा नवा पैलूही समोर आल्याची चर्चा आहे. विरोधकांचे मुद्दे सकारात्मकपणे स्वीकारण्याची भूमिका एकीकडे कौतुकास्पद मानली जात असताना, दुसरीकडे ‘योग्य क्षण हुकला’ ही बाब अधिक गाजत आहे.








