Breaking

Nitin Gadkari : गडकरींच्या तंबीनंतर धावपट्टीचे काम पूर्ण; 1 एप्रिलपासून २४ तास सेवा

24-hour Service to Start at Nagpur Airport from April 1 : नागपूर विमानतळावरवरून कोल्हापूर-गोवा-जयपूरसाठी विमानसेवा

Nagpur नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ (Dr. Babasaheb Ambedkar Airport) येत्या १ एप्रिलपासून २४ तास सुरू राहणार आहे. या विमानतळावरील धावपट्टीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानाची ये-जा होत नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gdkari) यांनी पुढाकार घेतला. गडकरींच्या तंबीनंतर उशिराने का होईना धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे.

नागपुरातील धावपट्टीची डागडुजी करण्याची आवश्यकता होती. ही डागडुजी जवळपास एक दशकापूर्वी झाली होती. त्यानंतर धावपट्टीच्या डागडुजीचे काम झाले नव्हते. या कामाला गेल्या ऑक्टोबर महिन्यांमध्ये सुरूवात झाली होती. हे काम केवळ तीन महिन्यात पूर्ण करावयाचे होते. परंतु या कामाला उशिर होत आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकांमुळे चार्टर्ड विमानांची ये-जा असल्याने काम रेंगाळले होते.

परंतु, गडकरींनी पुढाकार घेतल्याने या कामाला गती मिळाली. नागपूरचे विमानतळा मिहान इंडीया लिमीटेड (MIL) व महाराष्ट्र एअरपोर्ट विकास महामंडळ (MADC)च्या अख्त्यारित येते. नागपूर विमानतळाचे देखरेख करण्याचे कंत्राट मात्र जीएमआर कंपनीला मिळालेले आहे. या कामावर नागरी उड्डयण महासंचालकांचे (DGCA) नियंत्रण आहे. या धावपट्टीचे काम संपल्यानंतर विमानतळाची देखरेख जीएमआर कंपनीकडे सोपविले जाणार आहे.

नागपूर विमानतळावर तयार होणारी धावपट्टीची लांबी ४ हजार मिटर असून रुंदी ६० मीटर एवढी आहे. धावपट्टीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने नागपूर विमानतळावर सध्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानांची वाहतूक होऊ शकत नाही. केवळ व्हीआयपींचे विमाने असले तरच दिवसा विमानांचे उड्डाण होत आहे. नागपुरात दररोज ७० विमानांची ये-जात होत असते.

नवी विमानसेवा सुरू होणार

धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागपुरातून जयपूर (Jaipur), गोवा (Goa) व कोल्हापूर (Kolhapur) या शहरांमध्ये विमानसेवा उपलब्ध होणार आहे. या धावपट्टीचे काम ३१ मार्चपर्यंत संपवून १ एप्रिलपासून 24 तासासाठी ही धावपट्टी विमानांच्या उड्डाण व उतरण्यासाठी सुरू राहणार आहे. यामुळे या तीन शहरात जाणार्यांना ही विमानसेवा सुद्धा उपलब्ध होणार आहे. सध्या वेळेच्या अभावामुळे या शहरांमध्ये विमानसेवा सुरू झालेली नाही.

  • सुरेश भुसारी, संपादक

    संपादक, सत्तावेध

    गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. 'लोकसत्ता', लोकमत' व 'सकाळ'सारख्या माध्यम समूहांमध्ये वार्ताहर ते दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून वार्तांकन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषदेसह विधानसभा व संसदेतील वार्तांकनाचा त्यांना अनुभव आहे. राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. नागपुरातील ऐतिहासिक घटनांवर आधारित 'हरवलेलं नागपूर' या त्यांच्या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथलेखनाचा पुरस्कार मिळाला आहे.