Nitin Gadkari : प्रगतीच्या साधनांसोबत समृद्ध विचारसरणीही तेवढीच आवश्यक !

Appeal to carry forward the tradition of knowledge and thought; Emphasis on strengthening the reading culture : ज्ञान–विचारांची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन; वाचनसंस्कृती बळकट करण्यावर भर

Nagpur : बदलत्या तांत्रिक युगात केवळ प्रगतीची साधने नव्हेत, तर समृद्ध विचारसरणी हीही तेवढीच आवश्यक आहे. हे विचार घडवणारे माध्यम म्हणजे पुस्तके, असे मत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि झिरो माईल युथ फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाला वाचक, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली.

गडकरी यांनी सांगितले की, पुस्तकांचे महत्त्व केवळ माहितीपुरते मर्यादित नसून त्यातून विचारक्षमता, संवेदनशीलता आणि संस्कारही विकसित होतात. “लहानपणी वाचलेल्या पुस्तकांनी माझ्या विचारांवर परिणाम केला. वाचन हे व्यक्तिमत्त्व घडवणारे साधन आहे आणि नव्या पिढीने त्याची कास धरली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाला ज्ञानाधिष्ठित विकासाची गरज असून, वाचनसंस्कृती मजबूत झाली तर समाज अधिक सक्षम बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari : मेळघाटात मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र, कोठा येथे साडी निर्मिती उद्योग

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय परंपरेतील ज्ञानाची सातत्यपूर्ण वाटचाल अधोरेखित करत, आपली परंपरा सदैव ज्ञानकेंद्रित राहिली आहे. मध्यंतरात काही अडथळे आले असले तरी वाचनाची परंपरा कधीच खंडित झालेली नाही, असे मत व्यक्त केले. पुण्यातील पुस्तक महोत्सवांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि कोट्यवधींची विक्री याचा उल्लेख करत त्यांनी वाचनसंस्कृती वाढण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक संकेत असल्याचे नमूद केले.

लेखक अमिश त्रिपाठी यांनीही वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत, काल्पनिकतेपासून तत्त्वज्ञानापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. वाचन आपले विचार उंचावते आणि दृष्टीकोन विस्तारते, असे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले.

Nitin Gadkari : वाद्यांच्या फ्यूजनची नागपूरकरांवर ‘संगीत मोहिनी’

राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी यावेळी सांगितले की, पुस्तक महोत्सवासोबतच झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा महोत्सव केवळ पुस्तकांचा बाजार नाही, तर साहित्य–संस्कृतीचा उत्सव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari : साहेब, पेन्शनचे काम झाले हो, ज्येष्ठाने मानले गडकरींचे आभार

महोत्सवाला देशभरातील सुमारे तीनशे प्रकाशकांची उपस्थिती असून विविध दालनांमध्ये नव्या–जुन्या पुस्तकांचे समृद्ध संकलन पाहायला मिळत आहे. गडकरी आणि पाटील यांनी या दालनांना भेट देत प्रकाशकांशी संवाद साधला. बालमंडपात लहान मुलांना पुस्तकवाटपही करण्यात आले. हा महोत्सव ३० नोव्हेंबरपर्यंत वाचकांसाठी खुला राहणार आहे.