Gadkari recounts old memories of BJP office : गडकरींनी सांगितली आठवण; भाजप कार्यालयाच्या निमित्ताने उजाळा
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आठवणींचा खजिना म्हटले जाते. त्यांना अगदी योग्य प्रसंगांना जुने किस्से, गमती-जमती, घटना आठवतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. रविवारी भाजपच्या कार्यालयाचे भूमिपूजन झाले, त्यावेळी याची पुन्हा एकदा प्रचिती आली. जुन्या कार्यालयाच्या पूर्वीच्या दिवसांना त्यांनी उजाळा दिला. त्यावेळी घरमालकाच्या बाबतीत सांगितलेली आठवण ऐकून उपस्थितांना हसू आवरले नाही.
भाजपच्या महाल-गांधीसागर येथील नवीन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला. याला भाजपच्या स्थापनादिनाचेही औचित्य होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. गडकरींनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही ‘मोलाचा सल्ला’ दिला. त्याचवेळी त्यांनी जुन्या भाजप कार्यालयातील एक गंमतही सांगितली.
Nitin Gadkari : भाजपचे कार्यालय सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे केंद्र ठरेल !
गडकरी म्हणाले, ‘जुने कार्यालय भाड्याने घेतलेले होते. अनेक दिवस कार्यालयाचे भाडेच आम्ही दिले नव्हते. त्यामुळे घरमालक ढवळे वैतागले होते. त्यातच आणीबाणी लागू झाली. तेव्हाची परिस्थिती विचित्र होती. पण या सगळ्यांत ढवळे यांना आता भाडं मिळणार नाही, असं वाटू लागलं. त्यामुळे ते भाडं मागण्यासाठी संघ कार्यालयात गेले होते.’ ही आठवण सांगताना स्वतः गडकरींना देखील हसू आवरलं नाही.
‘तुम्हालाही झळ बसेल’
निवडणुकांच्या सभांमध्ये गडकरी कायम एक वाक्य बोलत होते. ‘जो करेगा जात की बात… उसको कसके पडेगी लात’, हे त्यांचं वाक्य चांगलच गाजलं. आजही ते याचा उल्लेख करतात. पण भाजपच्या कार्यक्रमात त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनाही ‘पुढे धोका आहे’ असे सांगितले. अर्थात यापूर्वी त्यांनी दोनवेळा जाहीर सभांमध्ये बावनकुळे यांना जातीनिहाय सेल स्थापन करण्यावरून टोमणा मारला होता. पण रविवारच्या भाजपच्या कार्यक्रमात त्याची चांगलीच चर्चा झाली.
Devendra Fadanvis : जेवढा घराच्या भूमिपूजनाचा आनंद, तेवढाच भाजप कार्यालयाचा !
गडकरी म्हणाले, ‘मी पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा जातीनिहाय खूप सेल तयार केले. तेव्हाच्या वरीष्ठांनी मला, हे योग्य नसल्याचा सल्ला दिला होता. पण सर्व जाती जोडायच्या आहेत, असे सांगून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर मला त्याची झळ बसली. मग मी अनुभवातून शिकलो. आता बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनाही झळ बसल्याशिवाय लक्षात येणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत ५० जातीवाल्यांचे तिकिटांसाठी पत्र येतील, तेव्हा ते जातींचे सेल गुंडाळतील.’ गडकरींच्या या खुसखुशीत भाषणाने जोरदार हशा पिकला.








