Nitin gadkari : “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ”

nitin-gadkari-strong-remark-against-petroleum-lobby-green-energy-pune-event : पेट्रोलियम लॉबीवर नितीन गडकरींची थेट टीका, ग्रीन एनर्जीला चालना देण्याचा पुनरुच्चार

Pune : पर्यायी ऊर्जेच्या विकासासाठी देशाने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर थेट टीका केली. पुण्यात आयोजित इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला, तर राजकीय आणि औद्योगिक वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गडकरी यांनी देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत भाष्य करत पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवायचे असेल तर ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण अनेक पर्यायी ऊर्जेसंबंधी योजना मांडल्या तेव्हा काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली आणि आपल्याला वेड म्हणाले, मात्र त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून दाखवले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Municipal council limits : बुलढाणा नगरपरिषद हद्दवाढीला उद्धवसेनेचा विरोध; प्रस्ताव तत्काळ रद्द करण्याची मागणी

ग्रीन एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देतानाच गडकरी यांनी कठोर भूमिकाही व्यक्त केली. चांगले काम करणाऱ्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल, मात्र कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांना आपण अजिबात सहन करणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या ठाम स्वभावाची झलक दाखवली.

या वेळी त्यांनी पेट्रोलियम क्षेत्रातील प्रभावी लॉबीवरही निशाणा साधला. ग्रीन एनर्जीच्या प्रकल्पांना अडथळे निर्माण करण्यासाठी पेट्रोलियम लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला. “माझ्या विरोधात पेट्रोलियम लॉबी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशा दबावाला आपण घाबरणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पर्यायी ऊर्जेच्या चळवळीला रोखणे कोणालाही शक्य नसल्याचे सांगितले.

Akola Municipal Corporation : कर्मचाऱ्यांना मुदतवाढ, बीओटी प्रकल्प आणि पाणीपुरवठा कामांवर होणार निर्णय?

यावेळी त्यांनी संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन करताना “जो लढाई सोडून पळतो तो संपतो. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढूनही लढू शकतो, जिंकू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो,” असे ठामपणे सांगितले.

देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी जैवइंधन, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन तसेच इतर पर्यायी ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना देणे अत्यंत आवश्यक असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. या क्षेत्रात उद्योगांनी पुढाकार घेतला तर भारत ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील या कार्यक्रमात गडकरी यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि पेट्रोलियम लॉबीवर केलेल्या थेट टीकेमुळे राजकीय तसेच औद्योगिक वर्तुळात या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

__