NMC चे ‘कचऱ्याचे राजकारण’ राष्ट्रवादीचा दणका, मनपा मुख्यालयातच फेकला कचरा !

NCP’s blow, garbage thrown at Nagpur Municipal Corporation headquarters : स्वच्छता व्यवस्थापनातील ढिसाळ कारभाराविरोधात हल्लाबोल मोर्चा; दोन दिवसांत काम सुरू न केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा, गंभीर निष्काळजीपणा आणि शहरातील कचराकोंडीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल (१९ नोव्हेंबर) अभूतपूर्व शैलीत ‘घाण-निषेध’ केला. शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या आयोजनात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाने मनपा प्रशासनाचा कारभार अक्षरशः उघड केला.

मोर्चातील आंदोलकांनी शहरातील विविध भागातून गोळा केलेला कचरा थेट NMC मुख्यालयाच्या प्रांगणात आणि प्रवेशद्वारावर फेकून प्रशासनाला जोरदार इशारा दिला. वाढत्या घाणीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि मनपाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडावर मास्क लावून निदर्शने केली. श्रीकांत शिवणकर यांनी प्रशासनाला प्रतीकात्मक संदेश देत सिंगल यूज प्लास्टिकने भरलेले पॅकेट आयुक्तांना भेट दिले.

MLA Sajid Khan Pathan : डॉक्टर वेळेत येत नाहीत, कर्मचारी उपस्थित नाहीत, रुग्णांचे हाल

यावेळी शिवणकर म्हणाले, शहर कचऱ्याने सडत आहे, दुर्गंधी पसरली आहे, तरी मनपा सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यातही अपयशी ठरली. म्हणून ही भेट खास आयुक्तांसाठी. ही घाणीची भेट स्वीकारून मनपाने स्वाभिमान जागा करावा आणि तातडीने कारवाई सुरू करावी. शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी मनपा प्रशासनावर थेट निशाणा साधत म्हटले की, ज्यांना स्वच्छता राखता येत नाही, त्यांनी खुर्च्या खाली कराव्या. NMC केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. शहरवासीयांना मिळत आहे घाण आणि दुर्गंधीचा शाप.

Municipal Council Elections : धुळ्यात दोंडाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपा नगराध्यक्ष बिनविरोध

मोर्चानंतर राष्ट्रवादीने आयुक्तांना निवेदन देत कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. तसेच शहरातील ५० कचरा ठिकाणांचे प्रकल्प लांबणीवर टाकणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. अहिरकर यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत स्पष्ट इशारा दिला आहे.

Pune land scam : पार्थ पवारांना क्लिन चिट नाही, सीडीआर मागवण्याची मागणी!

कचरा ठिकाणांचे सौंदर्यीकरण युद्धपातळीवर सुरू झाले नाही, तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभे करेल. NMC च्या भ्रष्ट, निष्क्रिय कारभाराला जनता आता धडा शिकवणार आहे.
या मोर्चात तानाजी वनवे, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, ब्रह्मानंद मस्के, अभिदत्त फाले, राजू मिश्रा, राकेश घोसेकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राष्ट्रवादीच्या या आंदोलानंतर मनपा प्रशासनावर जबरदस्त दबाव निर्माण झाला असून पुढील 48 तास नागपूरसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.