Doctor engaged in obscene behavior at health center arrested : आरोग्य केंद्रातील अश्लील वर्तन करणारा डॉक्टर अखेर गजाआड!
Solapur: प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. एका महिलेला वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट हवे असल्याने ती आरोग्य केंद्रात तपासणी साठी गेली . तपासणी करत असताना आरोग्य केंद्रातील डॉक्टर अमित गायकवाड याने तपासणीच्या नावाखाली महिलेस अश्लील रीत्या स्पर्श केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला घाबरली, मात्र तिने धाडस दाखवत थेट पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार दिली.
महिलेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांनी डॉक्टर अमित गायकवाड याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, तत्काळ कारवाई करत त्याला अटकही करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे शासकीय आरोग्य संस्थांमधील महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.सरकारी सेवेतील कर्मचारीच अशा प्रकारचे वर्तन करत असतील, तर महिलांनी विश्वासाने कुठे जावे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.