Orange production increased in Amravati district : राज्य सरकारच्या ‘एक जिल्हा, एक पीक’ योजनेचा परिणाम
Amravati राज्य सरकारच्या ‘एक जिल्हा, एक पीक’ या योजनेने अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनावर चांगला परिणाम झाला आहे.या योजनेचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनाला चालना देणे आहे. या योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातील संत्रा उद्योग समाविष्ट करण्यात आला आहे. त्या अंतर्गत 40 टक्क्यांपर्यंत अनुदान संत्रा उद्योगासाठी दिले जात आहे. आणि त्याचे चांगले परिणाम आता मिळायला लागले आहेत, हे विशेष.
या योजनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एक महत्त्वाचे पीक निवडून त्याचा ब्रँड विकसित करण्यास मदत केली जाते. अमरावती जिल्ह्यात संत्रा हे प्रमुख फळपीक आहे. सध्या जिल्ह्यात ८३,००० हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून, त्यापैकी ७३,००० हेक्टर क्षेत्र हे फलधारणक्षम आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्यात संत्रा उत्पादक कंपन्यांचे एकूण १२ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी १२ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये ८,००० मेट्रिक टन संत्र्याचे तीन ते चार प्रक्रिया प्रकल्पांद्वारे रूपांतर होत आहे. काही प्रकल्प सध्या प्रक्रियेत आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे ८२,३८८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ७२,६४६ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. यामध्ये १०,००५ हेक्टरवर मृग बहार, तर ६२,६४१ हेक्टरवर आंबिया बहार घेतला जातो. एकूण ७,७१,०६३ मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन होत आहे.
जिल्ह्यातील १२ संत्रा प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे. तसेच आणखी १६ प्रकल्प प्रस्तावित आहेत. मंजूर प्रकल्पांना ४० टक्के अनुदान मिळणार असून, त्यासाठी २२ कोटी रुपये वितरित केले जातील. एकूण प्रकल्पांचा अंदाजे खर्च ३८ कोटी रुपये आहे.
बांगलादेश सरकारने आयात शुल्क वाढवल्याने संत्रा निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे संत्र्याच्या दरात घट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रक्रिया उद्योगाद्वारे क्लीनिंग, ग्रेडिंग, वॅक्सिंग आणि पॅकेजिंग केल्या जात असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत संत्र्याला मागणी निर्माण होत आहे.








