Devendra Fadnavis Will Expose Invisible Forces Behind Jarange at Appropriate Time : जेव्हा जेव्हा फडणवीस सत्तेत असतात, तेव्हा आंदोलने होतात
Nagpur : ओबीसींच्या कोट्यातूनच आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे जिद्दीला पेटले आहेत. केवळ हेच नाही, तर मराठा आरक्षणासाठी त्यांनी केलेले प्रत्येक आंदोलन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी केलेले आहे. ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळणे शक्य नाही, हे त्यांना वारंवार सांगण्यात आले. पण जरांगे आपला हट्ट सोडण्यास तयार नाही. इकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या हक्कांसाठी नागपुरात रस्त्यावर उतरला आहे. उद्या महासंघ मुंबईतही जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा फडणवीस सत्तेत असतात, तेव्हा तेव्हाच जरांगे आंदोलने करतात. जरांगेंच्या मागे कोणती अदृश्य शक्ती आहे, हे सरकारला माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी त्याचा खुलासा करतील, असे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
मुंबईच्या आझाद मैदान परिसरात मनोज जरांगे समर्थकांसह आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या बांधवांना विविध पक्षांकडून जेवण पाठवले जात आहे. मुंबईत आलेल्या लोकांना जेवण देणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे यावर कुणी आक्षेप घेण्याचे कुठलेही कारण नाही. पण एक मात्र खरे की जरांगे यांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करणे, येवढाच आहे. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात किंवा सत्तेत असतात, तेव्हा तेव्हा मनोज जरांगे आंदोलन करतात, असेही डॉ. भोयर म्हणाले.
फडणवीस यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून विसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारे लोक कोण आहे, हे जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास सरकारवर आहे. आंदोलनासाठी बारामती भागातून रसद पुरवली जात आहे. त्या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तसे इतर पक्षांचेही आमदार, खासदार आहेत. त्यामुळे महायुतीचेच पदाधिकारी रसद पुरवित आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. इतर पक्षांच्या लोकांकडूनही हे काम होऊ शकते.
Maratha movement : मराठा आंदोलन पेटले, कोर्टाकडून कडक निर्देश !
सरकारसाठी सर्व समाजाचे लोक एकसारखे आहेत. त्यामुळे एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढणं, हे योग्य होणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम यापूर्वीही फडणवीस सरकारने केलं आहे. त्यामुळे आताही लोकशाहीच्या मार्गाने कृती करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे, असे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.