Ravikant Tupkars preparation to go to court : तूपकरांच्या संघटनेची न्यायालयात जाण्याची तयारी
Beed : परळी तालुक्यातील पांगरी येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. हा कारखाना तब्बल 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपकडे विकण्यात आला असून, विक्रीची नोंद 14 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील रजिस्ट्री कार्यालयात करण्यात आली आहे. या निर्णयानंतर सहकार क्षेत्रात आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या विक्रीविरोधात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. संघटनेचा आरोप आहे की, कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासदांना वा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आला आहे. व्यवहारामागे पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून, कारखाना कवडीमोल दरात विकून बँकांचे कर्ज बुडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाईमध्ये कसा विकला जाऊ शकतो? कारखाना कौठळी तांडा येथील कुळाच्या जमिनीत उभा आहे, आणि अशा जमिनीत विक्रीस कायदेशीर मर्यादा आहेत. त्यामुळे हा व्यवहार कायद्याच्या कक्षेबाहेर असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, या विक्री करारावर पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाच्या सह्या असल्या तरी त्यांच्या बहिणी यशश्री मुंडे यांची सही नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यशश्री मुंडे यांनी हा व्यवहार मान्य केला नव्हता का, असा थेट सवाल करपे यांनी उपस्थित केला आहे.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली नाही, तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी बेमुदत उपोषणाला बसण्यात येईल. त्यामुळे परळी परिसरात आणि संपूर्ण सहकार क्षेत्रात तीव्र राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
_____