Rajendra Pawars reply to Ajit Pawars taunt : अजित पवारांच्या टोमण्याला राजेंद्र पवारांचे उत्तर
Baramati : पवार घराण्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता. “भावकीने लक्ष घातलं नसतं, तर तू निवडून आला नसता” असं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीत व्यासपीठावरून अजित पवारांना थेट उत्तर दिलं.
राजेंद्र पवार म्हणाले, “आमच्या घराण्यात प्रत्येक काकाने पुतण्याला संधी दिली आहे. माझ्या वडिलांनीही सुरुवातीला अजितदादांना निवडणुकीत साथ दिली. नवख्या उमेदवाराला किती मतदान मिळतं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर अजितदादांनी 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्त्व केलं. काळ आणि वेळ बदलते. काही जण पोस्टल मतांवर निवडून येतात, पण त्यावरून कुणाला कमी लेखता येत नाही.”
Police Commissioner : कुत्रा फिरवताय.. सावधान ! तोंडावर जाळी आणि पट्ट्यावर मालकाचे नाव लिहा !
ते पुढे म्हणाले, “छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मला वडिलांचा विचार करतील असं वाटलं होतं. पण काकांना नेहमी पुतणाच दिसतो. त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांनाच संधी दिली. मलाही तीन वेळा संधी मिळाली, पण त्यावेळी सांगितलं गेलं की सगळ्यांनीच राजकारणात यायचं नसतं. मी शांत बसलो. मला त्यावेळी समजलं नव्हतं की संधी आली तर ती खेचून घ्यायची असते. मला कारखान्यात संधी दिली नाही. कदाचित त्यांना वाटलं असेल हा नवीन कारखाने उभारेल. त्यामुळे मला मागे ठेवलं गेलं. पण आता मी इथे एआय तंत्रज्ञानाबद्दल बोलण्यासाठी उभा आहे.”
यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. “एकदा आम्ही गाई आणायला गेलो. अजितदादा पुढे केबिनमध्ये बसले आणि मी मागे शेपटाजवळ. दादांची गाय नेहमी माझ्यापेक्षा तीनपट भावाला विकली जायची. त्यांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय तीन हजाराला जायची, दादांची नऊ हजाराला,” असेही राजेंद्र पवार म्हणाले.
भविष्यातील बदलांवर भाष्य करताना त्यांनी एआयचा उल्लेख केला. “शेतकऱ्यांनी सबसिडीवर अवलंबून राहू नये. सरकार कधी ठोस निर्णय घेत नाही. पुढच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षकी पेशापासून ते वाहन चालवण्यापर्यंत सगळं बदलणार आहे. 2040 मध्ये मेंदू देखील बदलता येईल. त्यामुळे राजकारणही बदलणार आहे. भरणे मामा, त्या काळात आम्ही नसलो तरी तुम्हाला संधी आहे,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
Manoj Jarang’s Agitation : जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ‘वेट अॅंड वॉच’
राजेंद्र पवार यांनी यावेळी संशोधन संस्थांच्या कामाचाही उल्लेख केला. “माळेगाव संशोधन केंद्राने 265 सारखी उसाची जात काढून महाराष्ट्राच्या साखर उत्पादनात वाढ केली. पण त्या पाडेगाव संशोधन केंद्राकडे कुणाचं लक्ष जात नाही. विद्यापीठावर टीका करू नका, त्यांना मदत करा. शेतकऱ्यांनीही सबसिडीसाठी थांबू नये, जे स्वतः उभं राहतात तेच यशस्वी होतात,” असे ते म्हणाले.
बारामतीतील या कार्यक्रमात व्यासपीठावरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित असताना राजेंद्र पवारांनी हे वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये एकच कुजबुज पसरली.