The issue of village migration became heated : पेनटाकळी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू
Buldhana पेनटाकळी गावठाण स्थलांतरणाच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. नियोजित जागेवर पुरेसे प्लॉट उपलब्ध नसल्याने त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उतरून आंदोलन छेडले.
पेनटाकळी ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला आदेश दिले होते. त्यानुसार, मेहकर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख विभागाने मोजमाप करून जागेचा ताबा घेतला. नगररचना विभाग बुलढाणा यांनी या जागेचा अभिन्यास नकाशा तयार केला. परंतु, या रेखांकनानुसार केवळ २४९ प्लॉट्सच तयार करण्यात आले. प्रत्यक्षात, स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी किमान ३८० प्लॉट्स आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी या अपुऱ्या पुनर्वसन योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे.
Dr. Pankaj Bhoyar : PDKV च्या सहकार्याने शेतकरी आत्महत्या रोखणार!
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती की, पुनर्वसनासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी. परंतु, या मागणीची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. गुरुवारी सकाळी पंजाबराव इंगळे, पुंजाजी इंगळे, शंकर इंगळे, संतोष खरात, संतोष डुकरे, अलका गवई, लता वानखेडे, ज्योती वानखेडे, शिवा खरात यांच्यासह असंख्य पुरुष आणि महिलांनी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन सुरू केले.
पुंजाजी इंगळे, उपसरपंच, पेनटाकळी यांनी सांगितले की, “गावासाठी ३८० प्लॉट्स आवश्यक आहेत. प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. या आंदोलनाची पाहणी करण्यासाठी अॅड. माधुरी देवानंद पवार, मेहकर यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांनी सांगितले की, ‘ग्रामस्थांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः पाठपुरावा करू.’ सदर प्रकरणी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.








