Phule couple opposed to Brahminism said Chhagan Bhujbal in satara with Devendra Fadanvis : साताऱ्यातील कार्यक्रमा भुजबळ आणि मुख्यमंत्री एकत्र
Chhagan Bhujbal Satara मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज असलेले आमदार छगन भुजबळ शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) मुख्यमंत्र्यांसोबत साताऱ्यातील कार्यक्रमात उपस्थित होते. भुजबळांनी नाराजी धरल्यापासून अद्याप ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलेले नाहीत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जवळिक वाढलेली दिसत आहे. विशेष म्हणजे आपलं म्हणणं मांडण्यासाठी भुजबळांनी अजितदादांकडे जाण्याऐवजी फडणविसांकडे जाणं पसंत केलं होतं.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा (सातारा) येथे सावित्रीमाई जयंती उत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी भुजबळ यांची देखील व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होते.
Nitin Gadkari Varkari : गडकरींच्या ‘प्रवचनाने’ भारावले वारकरी !
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘फुले दांपत्याचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता. कुठल्याही जातीपातीला त्यांनी विरोध केला नाही. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा समाजाने आदर्श ठेवणे आवश्यक आहे.’ त्यांच्या जीवनातील महत्त्वाची ठिकाणे जोडण्याचे काम मार्गी त्वरित लावावे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार दरवर्षी 3 जानेवारीला नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा. फुले दांपत्याच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे, अशा मागण्याही भुजबळांनी केल्या.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. स्त्री शिक्षणाची सुरवात झाल्यामुळे आज महिला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाची शिखरे गाठत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेले हे गाव ग्रामविकास मंत्री म्हणून मी दत्तक घेत आहे. यापुढे कामासाठी निवेदने येणार नाहीत, असा नायगावचा विकास केला जाईल.’