व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र PM Kisan Scheme : पाच महिन्यांपासून फाईल पुणे-मुंबईतच; पीएम किसान लाभार्थी शेतकरी...

PM Kisan Scheme : पाच महिन्यांपासून फाईल पुणे-मुंबईतच; पीएम किसान लाभार्थी शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

PM-Kisan Samman Nidhi beneficiary farmers await justice : ११व्या हप्त्यापासून निधी थकीत; कृषी विभागाच्या दिरंगाईवर शेतकरी आक्रमक

Mehkar केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचे अनेक पात्र शेतकरी अद्यापही थकीत हप्त्यांच्या प्रतीक्षेत असल्याने मेहकर तालुक्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ११व्या हप्त्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने हा प्रश्न आता प्रशासकीय पातळीवरून थेट राजकीय पातळीवर पोहोचला आहे. सरपंच परिषद शिंदेसेना विदर्भचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद दामोदर दळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच मेहकर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, “कागदपत्रे पुणे-मुंबई येथे प्रलंबित आहेत” हेच उत्तर गेल्या पाच महिन्यांपासून दिले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Sanjay Gaikwad-Rahul Bondre : चिखलीत पुन्हा राजकीय भूकंप? गायकवाड-बोंद्रे गुफ्तगूने पेटली चर्चा

या दिरंगाईचा सर्वाधिक फटका लहान आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना बसत असून, खरीप-रब्बी हंगामाच्या तोंडावर आर्थिक नियोजन कोलमडल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या योजनेतच पात्र लाभार्थी वंचित राहत असल्याने स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाच्या समन्वयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Nashik crime news : फिर्यादीच निघाला आरोपी, नोकरीच्या आमिषाने महिलांचे शोषण

विशेष म्हणजे, हा मुद्दा आता केवळ थकीत हप्त्यांपुरता मर्यादित न राहता शेतकरी प्रश्नावर सरकारची संवेदनशीलता आणि स्थानिक यंत्रणेची जबाबदारी या व्यापक चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील हा वाढता असंतोष सत्ताधाऱ्यांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.अरविंद दळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन थकीत हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष अधिक तीव्र होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे.

error: Content is protected !!