pm-modi-to-inaugurate-50-electric-buses-nagpur-valentine-day-gift : कोराडी आगारातून ‘पी.एम. ई-बस’ सेवेचा होणार आभासी प्रारंभ; प्रदूषणमुक्त प्रवासासाठी १५० बसेसचे उद्दिष्ट
Nagpur जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरकरांना सार्वजनिक वाहतुकीची मोठी भेट देणार आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे ५० वातानुकूलित ‘पी.एम. ई-बस’ नागपूरच्या सेवेत दाखल होणार आहेत. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान मोदी कोराडी आगार येथील या बससेवेचे आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने लोकार्पण करणार आहेत. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवशी पंतप्रधानांकडून नागपूरला मिळालेली ही ‘पर्यावरणपूरक भेट’ शहराच्या विकासात मोलाची ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
Nagpur Municipal corporation : भाजपने ठरवला स्वीकृत सदस्यांचा फॉर्म्युला; कोणाची लागणार लॉटरी?
‘पी.एम. ई-बस’ सेवा हे नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे केवळ प्रवाशांचा अनुभव सुधारणार नाही, तर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल मोबिलिटी’च्या स्वप्नालाही गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस नागपुरात दाखल झाल्या असून, त्या सध्या आगारात सज्ज आहेत. केंद्र सरकारद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण १५० बसेस शहराच्या सेवेत रुजू होणार आहेत. या बसेसमुळे शहराच्या कार्बन उत्सर्जनात घट होऊन ‘स्वच्छ आणि हरित नागपूर’ मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.
या अत्याधुनिक पी.एम. ई-बसमध्ये २५ प्रवाशांच्या बसण्याची उत्तम सोय असून, दिव्यांगांसाठी विशेष ‘हायड्रोलिक ई-रॅम्प’ बसवण्यात आले आहेत. याशिवाय, अवघ्या ३० मिनिटांच्या ‘रॅपिड चार्जिंग’वर ही बस २२५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. यामुळे विनाअडथळा आणि कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे. या बसेस शहरातील एकूण ११ महत्त्वाच्या मार्गांवर चालवण्यात येणार आहेत.








