Poor condition of ₹46 crore worth roads; citizens express anger : प्रशासनावर रोष, ४६ कोटींच्या रस्त्यांची दुरवस्था; अपघातांमुळे संताप
Akola जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘निकृष्ट रस्त्यांचे शांती पूजन व होम-हवन’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे.
अकोला तालुक्यात विमानतळ मार्गे उभारण्यात आलेले बाभुळगाव–गुढी, अलीयाबाद–घुसर आणि उगवा–घुसर हे रस्ते सुमारे ४६.४० कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आले आहेत. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी खड्डे पडणे, रस्त्यांचे थर उखडणे अशा त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळे हे रस्ते विकासाचे प्रतीक ठरण्याऐवजी नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत आहेत.
या निकृष्ट कामांमुळे अनेक अपघात घडले असून काही नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. विशेषतः गरीब कुटुंबांवर उपचाराचा आर्थिक भार पडत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Amravati congress : पद ‘नाममात्र’ असल्याचे सांगत काँग्रेस नेत्याचा राजीनामा
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी ‘शांती पूजन व होम-हवन’ या प्रतीकात्मक आंदोलनाचा मार्ग निवडण्यात आला आहे. भविष्यात अशा निष्काळजीला आळा घालण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आयोजकांनी केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमास नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








