Coming together of both Rashtravadi is a family issue : पालकमंत्रिपदाचा निर्णय चार दिवसांत!
भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. ते भंडारा Bhandara येथे पत्रकारांसोबत संवाद साधत होते. या प्रश्नावर त्यांनी हा कौटुंबिक विषय असल्याचे विधान केले आहे. ‘हा एक प्रकारचा कौटुंबिक विषय आहे. राजकीय भाष्य करणे सध्या तरी योग्य नाही. येणारी वेळ काय ठरवते, ते बघणे महत्त्वाचे आहे,’ असं पटेल म्हणाले.
विधानसभा निवडणूक झाली. सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळ गठित झाले. आता पालकमंत्र्यांची प्रतीक्षा आहे. महायुतीच्या समन्वयक चर्चेनंतर अन्य जिल्ह्यांसह भंडारा जिल्ह्यालाही लवकरच तीन ते चार दिवसांत पालकमंत्री मिळणार आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली. निवडणुकीनंतर प्रथमच त्यांनी भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
आमच्यात मतभेद नाहीत
खासदार पटेल म्हणाले, ‘जिल्ह्याशी संलग्नित व निगडित असलेले पालकमंत्री जिल्ह्याला लाभतील असे मला वाटते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमचे कुठलेही मतभेद नाहीत. परिस्थिती बघूनच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. कुणाचेही मन दुखावू नये, याचीही काळजी घेतली जाईल. जिल्ह्यात विकासात्मक कामे कशी आणता येईल, यावर आमचा मुख्य फोकस आहे.’
आरोप सिद्ध झाल्यास शिक्षा
Beed येथील सरपंच हत्या प्रकरणावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘यात कुणाचेही नाव घेतले जात असेल तर ते चुकीचे आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्यांना नक्की शिक्षा झालीच पाहिजे. एसआयटी योग्य दिशेने तपास करीत आहेत. यामागे कुण्या अदृश्य शक्तीचा हात असेल, तर त्याचाही तपास सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे,’ असं ते म्हणाले.
भुजबळांचे काय?
मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून माजी मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal नाराज आहेत का, असेही त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना पटेल म्हणाले, ‘भुजबळ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मान, सन्मान राखला जाईल. याबाबतही योग्य तो सकारात्मक निर्णय होईल.’ पत्रकार परिषदेला अॅड. जयंत वैरागडे, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे आदी उपस्थित होते.
नाना पटोलेंची भेट
काही दिवसांपूर्वी आमदार नाना पटोले Nana Patole यांच्या मातोश्रींचे निधन झाले. प्रफुल्ल पटेल यांनी पटोले यांच्या निवासस्थानी भेट देऊन संवेदना व्यक्त केल्या. नाना पटोले यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबियांचे सांत्वन केले.