Bachchu Kadu attacks the government through a cartoon : झेपणार नव्हती, तर खोटी आश्वासने दिली कशाला ?
Amravati : व्यंगचित्र हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे बळ होते. त्यांचाच वारसा त्यांच्या पुतण्या राज ठाकरे यांनी पुढे नेला. आजही अनेक कलाकार व्यंगचित्रांच्या माध्यमातून थेट आणि प्रभावी संदेश पोहोचवत आहेत.राज्यात सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण आंदोलने उभारणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी आता व्यंगचित्राचा आधार घेतला आहे.एका व्यंगचित्रातून त्यांनी सरकारवर केवळ खडे नाही, तर ‘कडू सवाल’ केले आहेत.
बच्चू कडू यांनी आजपासून (ता. ८ जून) अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे आंदोनल सुरू केले. यावेळी व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर प्रहार केला. हे व्यंगचित्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यावेळी कडू म्हणाले, राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेवर विविध आश्वासनांची खैरात केली. यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना २१०० रुपये मासिक अनुदान ही दोन महत्वाची आश्वासने होती. मात्र या योजनांची अंमलबजावणी करताना सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. हे निधी वळवल्याच्या चर्चांमधून स्पष्ट होत आहे.
Neelesh Rane vs NItesh Rane: नीलेश राणेंचा बंधू नितेशला ‘सबुरीचा’ सल्ला
या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग, निराधार आणि शेतमजुरांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची घोषणा करण्याआधी त्यांनी प्रसिद्ध केलेले ‘कडू सवाल’ हे व्यंगचित्र सध्या समाजमाध्यमांवर चांगलेच चर्चेत आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूकपूर्व घोषणांची पोलखोल करत सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली आहे. “झेपणार नव्हती तर खोटी आश्वासने का दिली?” असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
शेतकरी आणि दिव्यांगांच्या व्यथा केंद्रस्थानी..
शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यामुळे त्यांचे उत्पन्न जवळपास शून्यावर पोहोचले आहे. दिव्यांग, अपंग व निराधारांना केवळ १५०० रुपयांत जगावे लागत आहे. त्यामुळे या घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी बच्चू कडू यांचे आंदोलन सरकारला चपराक ठरणार, अशी चर्चा आहे. कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, आणि दिव्यांगांना किमान ६ हजार रुपये मानधन या मागण्यांसाठी त्यांनी व्यंगचित्राचा आधार घेत सरकारला जाब विचारला आहे. रोजगाराच्या घोषणाही केवळ निवडणुकीपुरत्याच मर्यादित राहिल्या, त्याची अंमलबजावणी झालीच नाही, असा आरोपही त्यांनी केला.
‘व्यंगचित्र’ बनले आवाज..
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन गुरुकुंज मोझरी येथे हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणांवर आक्रमक टीका करणारे व्यंगचित्र हे फक्त चित्र नसून, जनतेचा आक्रोश आहे, असा संदेश बच्चू कडूंनी दिला आहे.