MLA’s personal assistant beats up protesters : प्रहार जनशक्ती पक्षाचा कारवाईचा इशारा; अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची मागणी
Buldhana शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि ऑल इंडिया पँथर सेना यांच्या वतीने संग्रामपूर येथे नियोजित टेंभा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांवर मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आमदार डॉ. संजय कुटे Sanjay Kute यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत व इतरांनी जातीय मानसिकतेतून ही मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
१५ एप्रिल रोजी नियोजित शांततापूर्ण आंदोलनाच्या तयारीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर काही आंदोलक आमदार कुटे यांच्या निवासस्थानी टेंभा आंदोलन करण्याच्या तयारीत असताना, प्रकाश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी निळे दुपट्टे परिधान केलेल्या आंदोलकांना उद्देशून जातीय टिप्पणी करत शिवीगाळ व धमकी दिली, असा आरोप आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, “तुमच्या गावात येऊन मारू, घोडे लावू, आमदारांच्या घरासमोर आंदोलन करायची हिंमत कशी झाली?”, अशा प्रकारचे धमकीवजा वक्य उच्चारण्यात आले. तसेच, पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
Prataprao Jadhav, Sanjay Gayakwad : जाधव-गायकवाड जगदंबेच्या दर्शनाला!
या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी प्रकाश राऊत यांच्यावर तत्काळ अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लोकशाही बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू आणि पँथर सेनेचे दीपक भाई केदार यांच्या वतीने देण्यात आला आहे.








