Pratapgad Festival Committee : पंताजी काका बोकील अधिवक्ता पुरस्कार ॲड. पारिजात पांडे यांना

Pantaji Kaka Bokil Advocate Award to Adv. Parijat Pande : शिवप्रताप दिनानिमित्त उद्या वाई येथे केला प्रदान

Nagpur : प्रतापगड उत्सव समिती (वाई) तर्फे दरवर्षी दिला जाणारा पंताजी काका बोकील अधिवक्ता पुरस्कार यंदा नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे पूर्व अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ॲड. पारिजात पांडे यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी वाई येथे आयोजित शिवप्रताप दिन कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठसा उमटवणारे स्वराज्याचे वकील पंताजी गोपीनाथ काका बोकील यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. अफजलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन उभा ठाकला त्या संकटाच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पंताजी बोकील यांनी कायदेशीर व राजकीय रणनीतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. स्वराज्याच्या बाजूने घनघोर वकिली करत त्यांनी महाराजांच्या निर्णायक मोहिमेत मोलाचे योगदान दिल्याची ऐतिहासिक नोंद आहे. त्यांच्या कार्याचा गौरव राखत न्याय क्षेत्रात लक्षणीय काम करणाऱ्या वकिलाला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

Municipal Council election : खामगाव–जळगाव जामोद–शेगाव मिळून ८ उमेदवार बाद

यंदाचे मानकरी ठरलेले ॲड. पारिजात पांडे हे गेली अनेक दशके नागपूरमध्ये वकिली क्षेत्रात सक्रिय आहेत. शिस्तबद्ध, संवेदनशील आणि कायद्याच्या काटेकोर पालनासाठी ते ओळखले जातात. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा येथे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली असून युवा वकिलांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. अधिवक्ता परिषदेतील त्यांच्या कामामुळेही राज्यभरातील विधिज्ञ व न्यायव्यवस्थेशी संबंधित घटकांना सकारात्मक दिशा मिळाली आहे.

Devendra Fadnavis : भाजपमध्ये भ्रष्टाचाराला जागा नाही, मुख्यमंत्र्यांचा दावा

प्रतापगड उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, ॲड. पांडे यांचे न्यायासाठी असलेले समर्पण, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि कायद्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवप्रताप दिनानिमित्त दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमात ऐतिहासिक वारसा आणि न्यायव्यवस्थेतील योगदान यांची सांगड घालणारा हा पुरस्कार विशेष महत्त्वाचा मानला जातो.

२७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून प्रतापगडाच्या पराक्रमाचा स्मरणोत्सव आणि आधुनिक न्यायविश्वात कार्य करणाऱ्या अधिवक्त्यांचा गौरव, या दोन्हींचा संगम साधणारा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.