व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prataprao Jadhav : निवडणूक होऊन दोन वर्षे झाली, श्रेयवादाची लढाई सुरूच!

Prataprao Jadhav : निवडणूक होऊन दोन वर्षे झाली, श्रेयवादाची लढाई सुरूच!

credit war on general election victory continues : लोकसभेतील विजयाचे श्रेय कुणाचे? दावे-प्रतिदाव्यांनी राजकारण तापले

Buldhana लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कधीच संपली, निकालावर शिक्कामोर्तबही झाले; मात्र बुलढाणा जिल्ह्यात “विजयाचे श्रेय नेमके कुणाचे?” याची राजकीय मोजदाद दोन वर्षांनंतरही सुरूच असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगू लागली आहे. वरकरणी हा वाद केवळ श्रेयवादाचा वाटत असला, तरी तो आगामी नेतृत्वाच्या दावेदारीचा सूचक इशारा मानला जात आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकत्याच चिखलीतील पक्षप्रवेश सोहळ्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा संदर्भ देत चिखली मतदारसंघाच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी थेट प्रतिप्रश्न करत “मग खामगाव, जळगाव-जामोदने काय दिलं?” असा सवाल उपस्थित केला. या एका प्रतिक्रियेमुळे महायुतीतील दडपून राहिलेला श्रेयवाद पुन्हा एकदा उफाळून वर आल्याचे बोलले जात आहे.

Dilip Sananda : सानंदा म्हणतात, आकाश फुंडकरांनी हे काम करावे!

महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला या विजयात स्वतःचा सिंहाचा वाटा असल्याची भावना आहे. शिंदेसेनेचे कार्यकर्ते मैदानात शेवटपर्यंत झटणारे आम्हीच होतो, असा दावा करत आहेत; तर भाजपच्या कार्यकर्त्यांचा सूर “युती नसती तर समीकरणे वेगळी असती” असा आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ मतांच्या आकड्यांपुरता मर्यादित न राहता विजयाचे राजकीय मालक कोण? या मोठ्या प्रश्नाभोवती केंद्रित होत आहे.

या परस्परविरोधी दाव्यांमागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वाचे केंद्रस्थान मजबूत करण्याची चढाओढ दडलेली असल्याचे चित्र आहे. लोकसभा विजयाच्या श्रेयावरून सुरू झालेली ही रस्सीखेच भविष्यातील उमेदवारी, संघटनात्मक ताकद आणि पक्षातील प्रभाव यासाठीची चाचपणी मानली जात आहे.

Deulgao raja municipal council : स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत गाजले अतिक्रमण

या वेगवेगळ्या दाव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, तळागाळातील मेहनत कोणाची आणि राजकीय फळ कोणाला? यावर चर्चा रंगू लागली आहे. परिणामी बुलढाण्यात सध्या मतांची मोजणी संपली असली, तरी श्रेयाची मोजणी अजूनही सुरूच असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

error: Content is protected !!