Prataprao Jadhav : ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता’; प्रतापराव जाधवांची टीका

NCP tried to end Shiv Sena, union MoS claims : साखरखेर्ड्यात पक्षप्रवेश सोहळा; स्थानिक निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करण्याचे आवाहन

Sakharkherda “राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने आम्ही शिवसेनेला जिवंत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळी वाट धरली. तो निर्णय योग्य ठरला आणि आज शिवसेना पुन्हा केंद्र तसेच राज्यात सत्तेत आहे,” असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

ते साखरखेर्डा येथे झालेल्या शिंदे गटाच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते. “राजकारण करताना डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी बांधून काम करणाऱ्यालाच जनता स्वीकारते. हे गुण महेंद्र पाटील यांच्या घराण्यात आहेत,” असेही ते म्हणाले.

Local Body Elections : नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत बदल; अनुभवी नेत्यांची पंचाईत!

या कार्यक्रमात माजी सरपंच आणि उबाठा तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, समाजबांधव, माजी सैनिक आणि विविध सामाजिक संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते. त्यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात शाखा उघडण्याचे आणि सभासद नोंदणीची मोहीम हाती घेण्याचे आवाहन केले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसोबत लढू; पण सन्मानजनक युती न झाल्यास स्वबळावरही तयारी ठेवा,” असा सल्ला त्यांनी दिला.

Local Body Elections : प्रारूप प्रभाग रचना जाहीर, काहींची राजकीय प्रतिष्ठा पणाला

जाधव यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांमुळे आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी गटांमध्ये अधिक चुरस निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या सोहळ्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, संदीप मगर आणि सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पोंधे यांनी केले.