prataprao-jadhav-biopic-posters-buldhana-prasad-oak-political-strategy-2026 : प्रसाद ओक साकारणार ‘भाऊंची’ भूमिका; कोटींच्या बजेटवर उलट-सुलट चर्चा
Buldhana निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर आणण्याचा नवा ट्रेंड आता बुलढाणा जिल्ह्यातही धडकताना दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या राजकीय प्रवासावर आधारित चित्रपटाचे पोस्टर्स जिल्ह्यात ठिकठिकाणी झळकू लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘भाऊ’ आपली राजकीय प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता विरोधकांमध्ये रंगू लागली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हा ‘सिनेमॅटिक’ प्रयोग होत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
प्रतापराव जाधव यांची भूमिका मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता प्रसाद ओक साकारणार असल्याने या चित्रपटाची ताकद वाढली आहे. ‘धर्मवीर’च्या यशानंतर प्रसाद ओक यांची फी वाढल्याचे बोलले जाते. अशात या भूमिकेसाठी त्यांनी किती मानधन घेतले आणि हा खर्च कोणाच्या खिशातून झाला, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चित्रपटाचे भव्य पोस्टर्स आणि निर्मिती मूल्य पाहता, यासाठी मोठी आर्थिक रसद पुरवण्यात आली असल्याचे समजते. हे प्रोडक्शन हाऊस कोणाचे आणि यामागे गुंतवणूक कोणी केली, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.
Khamgaon Mangesh Ingle : दोन पक्ष, दोन पदे… मंगेश इंगळे संचालकपदाचा मोह कधी सोडणार?
राजकीय क्षेत्रातील जानकारांच्या मते, हा चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नसून तो आगामी निवडणुकीसाठीची एक ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. चित्रपटात प्रतापराव जाधवांचा संघर्ष, स्थानिक अस्मिता आणि त्यांच्या कार्याची मांडणी कशी केली जाते, यावर सर्वकाही अवलंबून आहे. निवडणुकीच्या तोंडावरच चित्रपट प्रदर्शित करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. चित्रपटात नेमकी कोणती सत्य परिस्थिती दाखवली जाईल आणि कोणत्या गोष्टींना बगल दिली जाईल, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात झळकत असलेल्या पोस्टर्सनी सध्या केवळ वातावरण निर्मिती केली आहे. मात्र, चित्रपट प्रत्यक्ष प्रदर्शित झाल्यावर त्यातील संवाद आणि घटनाक्रमांवरून राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘भाऊंच्या’ भूमिकेला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात आणि त्याचा राजकीय फायदा त्यांना किती होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बुलढाण्यातील हा ‘सिनेमॅटिक प्रयोग’ यशस्वी झाल्यास, आगामी काळात इतर नेत्यांच्या आयुष्यावरही असेच चित्रपट पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








