Setback on home turf puts Shiv Sena on the defensive in Mehkar : ‘होमपीच’वरील पराभवाचा इशारा; मेहकरमध्ये शिवसेना बॅकफूटवर
Buldhana जिल्ह्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का देणाऱ्या ठरल्या आहेत. यामध्ये जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचाही समावेश असून, त्यांच्या ‘होमपीच’ मानल्या जाणाऱ्या मेहकर आणि लोणार या दोन्ही नगरपालिकांतील निकालांनी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
२०२४ या सरत्या वर्षात आधी विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवांमुळे ना. जाधव यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः ज्या मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार राहिले, त्याच भागात शिवसेनेला फटका बसणे हे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
मेहकर नगराध्यक्षपदासाठीची लढत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची ठरली. अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे किशोर गारोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार कासम गवळी यांचा १,२७९ मतांनी पराभव करत विजय मिळवला. हा विजय विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रभावी प्रयत्नांचे फलित मानला जात आहे.
Local Body Elections : २७ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक
या निकालामुळे मेहकरमध्ये शिंदे शिवसेना पुन्हा एकदा बॅकफूटवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, या भागात पक्षाला उतरती कळा लागल्याची चर्चा आहे.
लोणार नगरपालिकेतही शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. येथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आल्याने ना. जाधव यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेहकर-लोणार मतदारसंघात तीन वेळा आमदार राहिलेल्या नेत्यासाठी हे दोन्ही निकाल धक्कादायक मानले जात आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ना. जाधव यांचे लोकसभेतील मताधिक्य प्रामुख्याने घाटाखालच्या भाजपच्या मतांवर आधारित राहिले आहे. शिवसेनेची खरी ताकद ही घाटावरच केंद्रित असून, नगरपालिका निवडणुकांचे निकालही त्याचीच प्रचिती देतात.
घाटावर निवडून आलेल्या ४२ नगरसेवकांपैकी तब्बल २२ नगरसेवक एकट्या बुलढाण्यातून निवडून आले आहेत. उर्वरित २० नगरसेवक चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर येथून आहेत.
एकीकडे बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वात मिळालेला एकतर्फी विजय, तर दुसरीकडे मेहकर आणि लोणारमध्ये ना. जाधव तसेच माजी आमदार रायमुलकर यांच्या प्रभावक्षेत्रात शिवसेनेचा पराभव—हा विरोधाभास जिल्ह्याच्या राजकारणात ठळकपणे जाणवतो आहे.
Shock to Jorgewar : आमदार जोरगेवारांना धक्का ; चंद्रपूर निवडणूक प्रमुख पदावरून हटवले
‘होमपीच’वर बसलेला हा राजकीय धक्का येत्या काळात शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेला आणि नेतृत्वाच्या आत्मपरीक्षणाला चालना देईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल केवळ पराभव न राहता इशारा ठरतो की संधी, हे येणारा काळच ठरवेल.








