Prataprao Jadhav : माजी मंत्र्याच्या वाढदिवसाला राजकीय कोपरखळ्या!

Subodh Saoji clever opponent : मंत्री जाधव म्हणाले, ‘सुबोध सावजी चाणाक्ष विरोधक’

Buldhana माजी राज्यमंत्री सुबाेध सावजी यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त दिग्गजांची मांदियाळी जमली हाेती. यामध्ये एकमेकांवर काेपरखळ्या आणि राजकीय टोमण्यांची जबरदस्त मेजवानी मिळाली. पारंपारिक विराेधक असलेले मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह इतर नेते उपस्थित हाेते. या कार्यक्रमाने Buldhana जिल्ह्याच्या सुसंस्कृत राजकारणाच्या इतिहासात एक मानाचा तुरा खोवला गेला.

एक अफलातून राजकारणी आणि राजकारणातला गारुडी, अशी उपाधी सुबोध सावजी यांना लागलेली आहे. त्यांचा वाढदिवस सोहळा डोणगाव नगरीत जल्लोषात साजरा करण्यात आला. मिरवणूक, जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव अन् सत्कारासाठी राजकारणातील कट्टर विरोधकांची उपस्थिती, हे वैशिष्ट ठरले. माजी आमदार दाळू गुरुजी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम रंगला. यावेळी माजी मंत्री सुभाष ठाकरे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमूलकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार विजयराज शिंदे, श्याम उमाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रा. आशिष रहाटे, तात्या कृपाळ, लक्ष्मण घुमरे आदींची उपस्थिती होती.

माजीमंत्री सुबोध सावजी यांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी खास शुभेच्छा दिल्या. सावजींच्या भाषणाला त्यांनी खुमासदार उत्तरं दिली. त्यांनी जुन्या संघर्षाच्या गमतीदार आठवणीही सांगितल्या. ‘सुबोधभाऊंसारखा चतुर आणि चाणाक्ष विरोधक समोर असल्याने मी चुका टाळू शकलो. शिस्तीत राहिलो. कारण कुठल्याची चुकीचे भांडवल सावजी केव्हा करतील याचा नेम नव्हता,’ असेही ते म्हणाले.

आठवणींना उजाळा देत प्रतापराव म्हणाले, ‘सुबोध सावजी यांचा फार दरारा होता. सुबोधभाऊ सावजी यांच्या विरोधात कुणी तोंड उघडायला तयार नव्हते. सावजीदेखील आमची चांगलीच खिल्ली उडवायचे. ही पोरं लाल धुडके घेऊन येतात. त्यामुळे यांचे लाल धुडके बघितले की लोकं आपल्यालाच मतदान करतात. असा दावा ते बोलताना व्यक्त करायचे. माझ्या राजकीय जीवनावर सुबोधभाऊंचा प्रभाव आहे.’

Buldhana Collector : गौण खनिजाची अवैध वाहतूक; जिल्हाधिकारी ‘ॲक्शन मोड’वर!

जाधव पुढे म्हणाले, ‘सावजी आमच्यावर बरकाईने लक्ष ठेवणारे विरोधक होते. त्यामुळे आमच्यावर ठाणेदार चौबेच्या माध्यमातून अनेक केसेस दाखल केल्या. आयुष्यात मी पहिली निवडणूक लढविली ती बाजार समितीची. काँग्रेसमध्ये गटबाजी होती. एक सुबोधभाऊ सावजी यांचा गट होता. तर दुसरा स्व. भास्करराव शिंगणे, भाऊसाहेब लोंढे, आचाजी पाटील यांचा गट होता. आम्ही म्हणजे स्व. भास्करराव शिंगणे, लोंढे, आयाजी पाटील गटाचे पिट्टू होतो, असा समज निर्माण झाला होता.’

आमदार खरातांना चिमटे

प्रतापराव… तुमचा दरारा खूप आहे. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात कुठल्याच सुविधा नाहीत. एखादी बैठक बोलवा. या समस्या तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकता. गाव तिथे एसटी पोहचायला हवी. मेहकरला तुमचे खासगी बीएएमएस कॉलेज आहे. पण यासोबतच एक शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणा. या विधानसभा निवडणुकीत मी प्रचंड मेहनत घेतली म्हणून खरात यांचा विजय झाला. अन्यथा ते घरी बसले असते. माझ्यामुळे विजयी होऊन देखील खरात मला दुसऱ्याच्या सांगण्यावरून टाळतात, असा चिमटा सावजींनी घेतला.