The sacrifice of the young farmer will not go in vain : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा शब्द, कुटुंबीयांचे सांत्वन
Buldhana खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे. या मागणीसाठी आत्महत्या करणारे युवा शेतकरी कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे जाधव स्वतः मंत्री आहेत आणि केंद्र आणि राज्यात त्यांचे सरकारही आहे. पण तरीही त्यांच्या जिल्ह्यात एखाद्या शेतकऱ्याने शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी, हे दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाड गावातील कैलास नागरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमानिमित्त १६ मार्च रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नागरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
Water department : वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा याेजनेत भ्रष्टाचार
कैलासराव हे प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी घेतलेले टोकाचे पाऊल दुर्दैवी आहे. मात्र, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं जाधव म्हणाले.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ८८ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.
स्वर्गीय कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरे कुटुंबीयांना धीर देत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.