Anil Parab cannot be compared even to Chhatrapati’s nails : जाहिर माफी मागावी, अन्यथा सळो की पळो करून सोडू
Mumbai : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काल (६ मार्च) विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असे संभाजी राजांशी तुलना करणारे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा आज (७ मार्च) भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी धिक्कार केला.
आमदार दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. अनिल परब यांनी स्वतःची छत्रपती संभाजी महाराजांशी केलेली तुलना अशोभनीय आहे. त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. माध्यमांशी संवाद साधताना आमदार दरेकर म्हणाले की, अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केलीय. या विकृत मानसिकतेचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परब यांचा आम्ही धिक्कार केला.
Sexual Harassment of Women at Workplace : वर्धा जिल्ह्यातील ४३३ कार्यालयांमध्ये समिती!
काल सभागृहात अनिल परब यांनी “छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय”, असे विधान केले होते. आक्षेप घेतल्यानंतरही त्यांनी त्यांची चूक मान्य न करता छत्रपती संभाजी महाराजाची तुलना तुमच्याशी होते आहे. पाहिजे तर रेकॉर्डवर घ्या, अशी अरेरावीदेखील केली. राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाच्या चर्चेत केलेले किळसवाणे विधान अनिल परब यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला शोभणारे नव्हते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नखाचीसुद्धा तुलना अनिल परब यांच्याशी होऊ शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे तमाम शिवभक्त म्हणून आम्ही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर अनिल परब यांचा धिक्कार केला. त्यांनी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली आहे. त्याबाबत सभागृहात जाहीर माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांचे निलंबन करावे. तसेच राज्यपालांविषयी, अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केले, तेही असंसदीय आहे. त्याबाबत सभागृहात दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा अनिल परब यांना सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दरेकर यांनी दिला.
या आंदोलनात भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार चित्रा वाघ, आमदार संजय उपाध्याय, आमदार उमा खापरे, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह इतर विधानपरिषद सदस्य सहभागी झाले होते.