Pravin Pote : भाजप-युवा स्वाभिमानमध्ये ‘जुंपली’; भाजपने फेटाळला ‘मैत्रीपूर्ण’ लढतीचा दावा

BJP rejects Ravi Rana’s claim of a ‘friendly’ contest : रवी राणांच्या रणनीतीला भाजपचा छेद, स्थानिक पातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’

Amravati अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. “भाजपला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही,” अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आमदार रवी राणा यांच्या ‘मैत्रीपूर्ण लढती’चा दावा खोडून काढला आहे. या नव्या भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष (वायएसपी) आमनेसामने असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

आमदार रवी राणा यांनी भाजपसोबत ‘फ्रेंडली फाईट’ असल्याचे सांगत, भाजपचाच महापौर बसवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पोटे-पाटील यांनी यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “भाजप हा जगातील सर्वात मोठा आणि सक्षम पक्ष आहे. त्यामुळे कोणीही भाजपच्या नावावर फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये,” असा सल्ला त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रोड शोदरम्यान ‘केवळ भाजप’ हाच नारा दिला होता, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली

Ravi Rana : भाजप आमचा ‘मोठा भाऊ’, अमरावतीत ‘फ्रेंडली फाईट’ची रणनीती

युवा स्वाभिमान पक्षाने भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन ‘मजबूत उमेदवार’ देण्याची जी रणनीती आखली होती, ती पोटे-पाटील यांनी धुडकावून लावली आहे. भाजपचे ‘कमळ’ चिन्हावर ६८ अधिकृत उमेदवार रिंगणात असून, पक्ष केवळ त्यांच्याच पाठीशी उभा आहे. भाजपचे नाव वापरून मतदारांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या कोणत्याही अपक्ष किंवा इतर पक्षाच्या उमेदवाराला भाजपकडून संरक्षण दिले जाणार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम असून, सत्तेसाठी कोणत्याही छोट्या पक्षाची मदत घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजप स्वबळावर बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास पोटे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. यासाठी पक्षाने स्थानिक पातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ केले असून, सर्व अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

Municipal elections : भाजप – एमआयएम युतीचा राजकीय स्फोट, ‘पार्टी विथ डिफरंस’चा दावा ?

एकीकडे आमदार रवी राणा भाजपशी जवळीक साधून ‘दोस्ती’चा दावा करत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेतृत्व हा दावा फेटाळून लावत आहे. या परस्परविरोधी विधानांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, याचा फायदा विरोधकांना होणार की भाजप स्वबळावर गड राखणार, हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.