Utawali project victims announce protest : जलसमाधी आंदोलनाची घोषणा, प्रशासनावर गंभीर आरोप
Buldhana जिगाव प्रकल्पस्थळी जलसमाधी आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच आता मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. २५ वर्षांपूर्वी प्रकल्प पूर्ण झाला असला तरी अद्यापही मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही. वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी हे प्रकल्पग्रस्त येत्या २ सप्टेंबर रोजी उतावळी प्रकल्पात कुटुंबियांसह जलसमाधी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उतावळी प्रकल्पाला १९९८ साली मंजुरी मिळाली आणि २००४ साली प्रकल्प पूर्ण झाला. मात्र आजपर्यंत मोबदला किंवा वाढीव मोबदल्याच्या मागणीवर कार्यवाही न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे सरकारच्या आश्वासनांची पुन्हा एकदा पोलखोल होत असून, स्थानिक पातळीवर प्रशासनाचा निष्क्रियपणा चर्चेत आला आहे.
जिगाव प्रकल्पस्थळी झालेल्या घटनेने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जलसमाधी घेतलेल्या विनोद पवार यांच्या पत्नीने प्रशासनावर थेट आरोप करत म्हटले की, “लोकशाहीच्या नियमानुसार माझ्या पतीने जनतेच्या भल्यासाठी आंदोलन केलं. मात्र जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. योग्य ती खबरदारी न घेतल्याने माझ्या पतीला जीव गमवावा लागला. यासाठी प्रशासनच जबाबदार आहे.”
Rohit Pawar : रोहित पवारांनी आणले 12 हजार पानांचे ‘बॅगभर’ पुरावे !
१५ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावेळी विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली आणि वाहून गेले. तब्बल ४४ तासांनंतर १४ किमी अंतरावर धुपेश्वर जवळ त्यांचा मृतदेह सापडला. मृतदेह नदीतील गाळात फसलेला आढळला. दुर्दैव म्हणजे, आजवर जिल्हा प्रशासनातील एकही अधिकारी मृतकाच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी गेलेला नाही किंवा कोणतीही मदत केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची संवेदनशीलता कुठे हरवली असा प्रश्न उपस्थित होत आहे.