Sharad Pawar, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Sanjay Raut in the field : शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत मैदानात
Mumbai: महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विरोधी पक्ष आता थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली निवडणूक आयोगाच्या “भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात” १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, या मोर्चात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक सहभागी होणार आहेत. “मतदारांची ताकद काय असते, हे देशाच्या पंतप्रधानांनाही आणि निवडणूक आयोगालाही दाखवून देऊ,” असा इशाराच त्यांनी दिला.
या विराट मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रमुख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करणार आहेत. विरोधी पक्ष एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई लढण्याच्या तयारीत आहेत.
Raj Thackeray : राज ठाकरे यांचा आरोप : महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार
राऊत म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांविरोधात आम्ही लढतोय. दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही ही लढाई सुरू केली होती, आता हीच लढाई महाराष्ट्रातही उभी राहणार आहे.”
संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचा उल्लेख करत राज ठाकरेंच्या वक्तव्यालाही दुजोरा दिला. “राज ठाकरे यांनी अगदी बरोबर म्हटलं निवडणुकीचं ‘मॅच फिक्सिंग’ झालं आहे. महाराष्ट्राच्या मतदार यादीत आजही ९६ लाख बोगस मतदार आहेत, म्हणजे जवळपास एक कोटी. हे बोगस मतदार म्हणजे लोकशाहीतील घुसखोरच आहेत, आणि त्यांना यादीतून बाहेर काढणं हीच खरी लोकशाहीची लढाई आहे,” असं राऊत म्हणाले.
Local Body Elections : सावनेरमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला !
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या घोटाळ्यांबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आता विरोधक रस्त्यावर उतरून आंदोलनाची रणनीती आखत आहेत.
या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबरचा मुंबई मोर्चा हा महाराष्ट्रातील विरोधकांच्या एकजुटीचा आणि निवडणूक आयोगाविरोधातील पहिला मोठा शक्तीप्रदर्शनाचा इशारा ठरणार आहे.
______