MNSs strong opposition to tree felling in Tapovan : तपोवनातील वृक्षतोडीला मनसेचे तीव्र विरोध वातावरण तापले
Nashik : २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे १८०० झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून वृक्षतोडीच्या निर्णयाला नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक संघटनांसह राजकीय पक्षांकडून विरोध वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे आज तपोवन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, अभिनेते संतोष जुवेकर आणि अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले.
सरकारच्या निर्णयावर टीका करत अमेय खोपकर म्हणाले की, तपोवनातील झाडांवर फुल्या मारल्या गेल्या आहेत आणि ते म्हणजे आई-वडिलांवर फुल्या मारल्यासारखेच आहे. एकाही झाडाच्या फांदीला हात लागणार नाही, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाचा उल्लेख केला. “पार्थ पवारांना जसं माफ केलं, तसं झाडांना देखील माफ करा. झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन छेडेल,” असा इशारा त्यांनी दिला.
Indu Mill Smarak : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारकाचे लोकार्पण पुढच्या वर्षी !
खोपकर पुढे म्हणाले की, साधू – महंतांचे स्वागत मनापासून आहे, पण त्यासाठी तपोवनाची तोडफोड मान्य होणार नाही. “उरावर बसून आम्ही कुंभमेळा होऊ देणार नाही. हा परिसर रेसिडेन्शिअल झोन करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बिल्डरांच्या हितासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा डाव आहे,” असा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शिवाय जिथे पंधरा हजार झाडे लावली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्या भागातच कुंभमेळा आयोजित करावा, असेही त्यांनी सुचवले.
Passengers anger : इंडिगो एअरलाईन्सचे प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य
वृक्षतोडीच्या निर्णयाला सत्ताधारी पक्षातील मतभेदही जोडले जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता, तर शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तपोवनातील साधूग्राम प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच पर्यावरण संरक्षणाच्या प्रश्नामुळे तपोवनातील आंदोलनाला अधिक गती मिळत असून मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
___








